Saturday, May 4, 2024
Homeजळगावसावधान... तर होणार कारवाई

सावधान… तर होणार कारवाई

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

महापालिकेतर्फे विना मास्क फिरणारे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे नागरिक यांच्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

शहरातील सुभाष चौक, घाणेकर चौक, फुले मार्केट, टॉवर परिसर, दाणा बाजार परिसरात ही कारवाई करण्यात आली. उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मागर्दर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

कोरोनाच्या संसर्गातून आताशी कुठे सुटकेचा नि:श्वास नागरिक सोडत नाही तोच येत्या काही दिवसात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दिल्लीत तर या दुसर्‍या लाटेला सुरूवात ही झाली असल्याचे ऐकिवात आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा या दुसर्‍या लाटेची झळ कुणाला पोहोचू नये या साठी मनपातर्फे विना मास्क फिरणारे तसेच सार्वजनिक थुंकणारे यांचेविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे.

पथकाशी हुज्जत

महापालिकेच्या पथकातर्फे शहरातील सुभाष चौकासह विविध ठिकाणी विना मास्क फिरणार्‍या नागरिकांवर करण्यात आली यावेळी अनेक जण पथकाला पाहून आपल्या जवळील हातरुमाल वगैरे तोंडाला लावून घेत होते.

यावेळी काही नागरिकांनी दंड भरण्यावरून पथकाशी हुज्जत घातल्याचे पहावयास मिळाले. तर एकाची दुचाकी महापालिकेच्या पथकातील कर्मचार्‍यांनी उचलून घेतल्याने या तरुणाने तो दंड भरण्यास तयार असतांना देखील कर्मचार्‍यांनी त्याची दुचाकी जप्त केल्याची तक्रार केली.

यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती. तर पालिका कर्मचार्‍यांनी ते त्याच्याकडे रीतसर दंड भरण्याचे सांगत असतांना देखील त्याने दंड न भरल्याने ही कारवाई करण्यात आले असल्याचे सांगितले.

नागरिकांना आवाहन

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतांना खबरदारीचा उपाय म्हणून विना मास्क फिरणारे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर प्रत्येकी 200 रुपयांचा दंड करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपायुक्त श्री.वाहुळे यांनी नागरिकांनी घराबाहेर पडतांना मास्क वापरावा व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असे आवाहन केले आहे.

115 जणांकडून 23 हजाराची वसुली

दरम्यान मनपा पथकाने पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. यावेळी तब्बल 23 हजाराचा दंड संबधित हॉकर्स, नागरिक, रिक्षाचालक, पोलिस कर्मचारी, मनपाचे कर्मचारी, शासकीय कर्मचारी अशा सर्वच घटकांकडून वसूल करण्यात आले.

नियम तो नियम अशी शिस्त लावत उपायुक्त वाहुळे यांनी यावेळी यांनी नियमांचा भंग करणार्‍यांवर दंड वसूल करीत कारवाई केली. या कारवाईत त्यांनी कुणालाच सोडले नाही. या कारवाईची एकच चर्चा या परिसरात होत होती.

हॉकर्स, पोलिस कर्मचारी, दुकानदार अशा सर्वांकडून प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे 115 जणांवर ही कारवाई करण्यात आली. मनपाच्या पथकात नाना कोळी, संजय ठाकूर, सुनील पवार, किशोर सोनवणे, भानुदास ठाकरे, हुस्नोद्ीन भिस्ती, पंकज कोळी, मुकेश सोनवणे, राजु वाघ, श्री. पाटील यांचा समावेश होता. कारवाई सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त वाहुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या