Saturday, July 27, 2024
Homeनाशिकअतिक्रमण विभागाकडून अनधिकृत होर्डिंग्जबाजीवर कारवाई

अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत होर्डिंग्जबाजीवर कारवाई

पंचवटी | प्रतिनिधी

पंचवटीतील अनाधिकृत होर्डिंग्जबाजीवर अखेर महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई म्हणजे वराती मागून घोडे अशी चर्चा पंचवटीतील नागरिकांमध्ये सुरू आहे.

- Advertisement -

महापालिका उप आयुक्त नितिन नेर व विभागीय अधिकारी योगेश रकटे यांच्या आदेशाने दिशादर्शक कमानी व अनाधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनरवर शुक्रवार (दि.३) रोजी अतिक्रमण विभागाचे कर्मचाऱ्यांकडून मोहीम राबवुन दिशादर्शक कमानीवरील सर्व बॅनर उतरवून जप्त करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त यांनी सप्टेंबर महिन्यात शहरातील सर्व अनधिकृत बॅनर, होर्डिंग काढून घेण्याबाबत जाहीर आवाहन केले होते.या आवाहनानंतर देखील जे कोणी विनापरवानगी बॅनरबाजी करेल त्यांच्यावर मुंबई उच्च न्यायालय जनहित याचिकेच्या आदेशान्वये तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम,२४४ व २४५ व महाराष्ट्र महापालिका नियम,२०२२ नुसार सर्व अनधिकृत बॅनर,होर्डिंग्ज फलक जप्त करत या जप्तीच्या कारवाई करता येणारा खर्च संबंधितांकडून वसूल करत व महाराष्ट्र प्रिव्हेशन ऑफ डिफेंसमेंट ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट १९५ नुसार गुन्हा देखील दाखल करण्यात येईल असे सांगितले होते.

तर ६ ऑक्टोंबर रोजी पंंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी देखील पंचवटीतील अनाधिकृत होर्डिंग्जबाजीवर कारवाई करण्याबाबत पत्र महापालिकेच्या पंंचवटी विभागीय अधिकारी यांना दिले होते. परंतु या दोन्ही पत्र व्यवहारांना विभागीय अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात केराची टोपली दाखवत एक प्रकारे अनाधिकृत होर्डिंग्जबाजीला पाठिंबा दिला असल्याचे बघायला मिळाले.

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात वाहतूक बेट,दिशादर्शक कमानीवरील अनाधिकृत होर्डिंग्जबाजीबाबत वृत्त छापून आल्यानंतर जाहिरात परवाना विभागाकडून नवरात्रोत्सव संपत आल्यावर अतिक्रमण विभागाला परिसरात विनापरवानगी होर्डिंग्ज उभारल्याचे पत्र देण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारी झालेली कारवाई ही फक्त आयुक्तांची दिशाभूल करण्यासाठी केली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे या काळात देखील मोठ्या प्रमाणात शुभेच्छा फलक झळकण्याची शक्यता नाकारता येत नाही.निदान यावेळी तरी संबंधित विभागाने अनाधिकृत होर्डिंग्जबाजी होणार नाही किंवा अनाधिकृत होर्डिंग्जबाजीवर वेळत कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप

विभागीय अधिकारी,जाहिरात परवाना विभाग आणि अतिक्रमण विभाग यांच्यांत समन्वय नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत होर्डिंग्जबाजी होत असल्याचे चित्र आहे.तिन्ही विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे काही तक्रारदारांनी सांगितले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या