मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारास बंदी करण्यात येताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रचार शांततेत पार पडला आहे. मतदान देखील भयमुक्त वातावरणात पार पडावे यासाठी पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. मतदारांना दमबाजी अथवा पैसे व साहित्याचे आमिष दाखविणार्यांविरूध्द कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी येथे बोलतांना दिली.
विधानसभा निवडणूक प्रचाराची सांगता झाल्यानंतर नियंत्रण कक्षातील सुसंवाद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत अ.पो. अधिक्षक अनिकेत भारती यांनी पोलीस व निवडणूक यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मध्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत नितीन सदगीर, सहाय्यक पोलीस अधिक्षक तेगबीरसिंह संधू, इंडो तिबेट सशस्त्र दलाचे वरिष्ठ अधिकारी मनदीप धंडा, मनुदेव धानिया आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रचारादरम्यान सर्व राजकीय पक्ष-संघटनांनी पोलीस प्रशासनास सहकार्य केले आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी होणारे मतदान भयमुक्त वातावरणात व्हावे. या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून सशस्त्र पोलीस दलाचा अतिरिक्त बंदोबस्त येथे पाचारण करण्यात आला आहे, अशी माहिती देत भारती पुढे म्हणाले, मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून ड्रोन कॅमेर्याव्दारे देखील पोलीस केंद्रासह परिसरात लक्ष ठेवणार आहे. सोशल मीडियावर देखील सायबर सेलतर्फे नजर ठेवण्यात आली असून अफवा पसरविणारे मॅसेज अथवा फोटो, व्हीडीओ प्रसारीत करणार्यांविरूध्द आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले.
164 गुन्हेगारांवर तडीपार कारवाई
शहरातील विविध पोलीस ठाण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरूध्द निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी 164 गुन्हेगारांना पोलीस प्रशासनातर्फे शहरातून तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी ज्या मतदान केंद्रांवर त्यांचे नाव आहे तेथे जावून मतदान करण्यासाठी त्यांना सवलत दिली जाणार असून मतदान होताच त्यांनी शहरातून निघून जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. तडीपार कारवाई झालेले शहरात आढळून आल्यास त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती भारती यांनी पुढे बोलतांना दिली.
उमेदवार अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करू नये तसेच मतदारांना दमबाजी अथवा आमिष दाखविण्याचे प्रकार होवू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून ते संपुर्ण मतदार संघात गस्त घालून लक्ष ठेवणार असल्याची माहिती देत भारती यांनी मालेगाव बाह्य व मध्य मतदार संघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी 4 पोलीस उपअधिक्षक, 14 पोलीस निरीक्षक, 31 सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, 542 पोलीस, 70 महिला पोलीस, 544 गृहरक्षक दलाचे जवान व राज्य राखीव दलाची 1 तर सीआयएसएफ सशस्त्र दलाच्या तीन कंपन्या असा अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याचे सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा