मुंबई | Mumbai
अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन झाले आहे. करोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ते ५२ वर्षांचे होते. त्यांनी अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ते एक सेवानिवृत्त लष्करी अधिकारी होते.
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हंटले आहे की, ‘आज सकाळी करोनामुळे अभिनेता मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारीदेखील होते. त्यांनी बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या. त्यांच्या कुटुंब आणि मित्रांना मनापासून संवदेना.’
भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर बिक्रमजीत कंवरपाल यांनी २००३ मध्ये आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यांनी पेज ३, रॉकेट सिंग: सेल्समॅन ऑफ द इअर, आरक्षण, मर्डर २, २ स्टेट्स आणि द गाजी अटॅक यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला.
चित्रपटांशिवाय त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे. दीया और बाती हम, ये हैं चाहतें, दिल ही तो है आणि २४ या मालिकांमध्ये काम केलं.