Friday, November 6, 2026
HomeनगरAhilyanagar : ‘सुर्योदय’ने जुळली नाळ, नानांनी फुलवली दैठणे गुंजाळमध्ये जलधारा !

Ahilyanagar : ‘सुर्योदय’ने जुळली नाळ, नानांनी फुलवली दैठणे गुंजाळमध्ये जलधारा !

1991 मध्ये शूटिंगच्यानिमित्ताने परिचय झालेल्या वस्तांदाच्या गावात जलसंधारणाच्या कामांचा डोंगर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर आणि पारनेर तालुक्यांच्या सीमेवर वसलेल्या दैठणे गुंजाळ या गावाशी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे सुमारे तीन दशकांपासून जिव्हाळ्याचे नाते आहे. 1991 मध्ये सुर्योदय या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने नाना पाटेकर यांचा या गावाशी परिचय झाला. पुढे हा परिचय केवळ चित्रपटापुरता न राहता गावाच्या विकासाशी जोडला गेला. नाना पाटेकर आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गावात जलसंधारणाची मोठी कामे उभी राहिली आणि दैठणे गुंजाळच्या विकासाला नवी दिशा मिळाली.

- Advertisement -

दैठणे गुंजाळ हे गाव कुस्तीच्या वस्तादांसाठी ओळखले जाते. या गावातील मातीशी नानांची नाळ जोडली गेल्यानंतर त्यांचा ग्रामस्थांशी असलेला जिव्हाळा दिवसेंदिवस वाढत गेला. गावातील पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले. गाव व परिसरातील सुमारे सात ते आठ किलोमीटरच्या नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. त्याचबरोबर तलाव, नाले आणि नदी खोलीकरणासह विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली. या कामांमुळे गावातील पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत झाली. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली.

परिणामी शेतीला त्याचा सकारात्मक फायदा झाला. नदी खोलीकरणातून निघालेली माती रस्त्यालगत टाकून काही ठिकाणी रस्ते तयार करण्यासाठीही तिचा वापर करण्यात आला. त्यामुळे जलसंधारणासोबतच गावातील मूलभूत सुविधांच्या विकासालाही हातभार लागला. नाना यांच्या सहकार्याबरोबरच नाम फाउंडेशनचे राज्य समन्वयक विशाल नगरे यांच्या पुढाकारातून ही कामे मार्गी लागली. सरपंच पांडुरंग गुंजाळ, साहेबराव गुंजाळ, मोहनराव गुंजाळ, संजय येवले यांच्यासह गावातील पाणी प्रश्नावर काम करणार्‍या ग्रामस्थांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. गावकर्‍यांच्या सहभागामुळे जलसंधारणाची कामे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उभी राहिली.

नदी, नाले आणि तलावांचे खोलीकरण हे केवळ माती उपसण्यापुरते मर्यादित न राहता गावाच्या भविष्यातील पाणी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरले. या कामांमुळे दैठणे गुंजाळ परिसरातील जलसंधारणाच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळाली. चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने सुरू झालेले नाना पाटेकर आणि दैठणे गुंजाळचे नाते पुढे अधिक घट्ट झाले. दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थ नाना पाटेकर यांची भेट घेत असत. गावाशी असलेला हा जिव्हाळा केवळ औपचारिक राहिला नाही, तर गावाच्या अडचणी आणि विकासाच्या प्रश्नांशीही जोडला गेला.

कला आणि गावच्या मातीचे अनोखे नाते
सुर्योदय चित्रपटाच्या शूटिंगमुळे दैठणे गुंजाळच्या मातीशी नाना पाटेकर यांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे सामाजिक बांधिलकीत झाले. गावातील माणसं, संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण जीवन यांच्याशी कलाक्षेत्राचे नाते जोडण्याचे काम या निमित्ताने झाले. नाना पाटेकर यांनी दैठणे गुंजाळच्या विकासासाठी दिलेले योगदान हे केवळ जलसंधारणाच्या कामांपुरते मर्यादित नाही. गावाशी निर्माण झालेला जिव्हाळा, सामाजिक बांधिलकी आणि प्रत्यक्ष कृतीतून केलेले सहकार्य यामुळे त्यांचे दैठणे गुंजाळशी असलेले नाते आजही ग्रामस्थांच्या स्मरणात आहे. नाना पाटेकर आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून झालेली जलसंधारणाची कामे गावाच्या विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरली असून, ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या या योगदानाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.

ताज्या बातम्या

संपादकीय : ६ नोव्हेंबर २०२६ – ट्रम्प यांच्या मनमानीला चाप

0
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाला बसलेला धक्का हा केवळ जागांचा पराभव नाही, तर सत्तेच्या अमर्याद आत्मविश्वासाच्या जोरावर चालविलेल्या वावदूकपणाला मतदारांनी...