पुणे | Pune
मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सुरू केलेल्या ‘नाम फाऊंडेशन’ला नुकतेच १० वर्षं पूर्ण झाली. पुण्यात झालेल्या या दशकपूर्ती सोहळ्यात नानांनी अनेक विषयांवर मनमोकळे भाष्य केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंतही उपस्थित होते. 2015 मध्ये नाम फाउंडेशनची स्थापना झाली आणि आज या फाऊंडेशनची दशकपूर्ती होत आहे. नाम फाऊंडेशनचे कार्य आणि श्रेयवादावर बोलताना नानांनी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यावरही आपली मत मांडले.
समाजाला आपण काहीतरी देणे लागतो, म्हणून आम्ही चळवळ सुरु केली
नाना पाटेकर म्हणाले की, ‘नाम फाऊंडेशन’ला १० वर्षं पूर्ण झाल्याचा त्यांना खूप आनंद आहे. ते म्हणाले, “माझ्यापेक्षा मकरंद गावगाड्यात खूप फेमस आहे. त्याची गावाशी नाळ जोडलेली आहे. समाजाला आपण काहीतरी देणे लागतो, म्हणून आम्ही ही चळवळ सुरू केली.” हे फाऊंडेशन म्हणजे माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ६० लाख शेतकरी बांधवांना फायदा झाला. अनेक शेतकऱ्यांच्या फायद्याची कामे ‘नाम’तर्फे झाली आहेत,” असे ते म्हणाले.
पुढे राजकारण आणि शेतकऱ्यांबद्दल मतं मांडताना ते म्हणाले, “आम्हाला श्रेय वाद नको आहे. राजकीय व्यक्ती काय म्हणतात, त्यापेक्षा आपण कामाला महत्त्वं देणे महत्वाचे आहे. आम्ही कोणत्याही राजकीय व्यक्तीचा प्रचार करत नाही. शेतकरी बांधवांना पक्का हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना दीड पट हमीभाव मिळावा, असे माझे मत आहे.”
याच कार्यक्रमात नाना पाटेकरांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरही आपले वैयक्तिक मत मांडले. ते म्हणाले, “माझ्या मते, भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळूच नये. माझ्या लोकांचे रक्त सांडले आहे त्यांच्याशी का खेळावे? सरकारचे धोरण काय असावे माहिती नाही.” यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवरही अप्रत्यक्षरित्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





