मुंबई | Mumbai
राज्यात २९ महापालिकांची निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. मतदान ९ दिवसांवर येऊन ठेपली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे, राज्यभरात प्रचार सभा सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काल (सोमवारी) भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत मोठे विधान केले. “लातुरमधील विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील”, असे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे ऐन निवडणुकीच्या काळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. चव्हाणांच्या वक्तव्यावर आता विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख याने प्रत्युत्तर दिले आहे.
अभिनेता रितेश देशमुख याने सोशल मिडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत संयमित पण तितक्याच खणखणीत शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ‘लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही’, असे रितेश देशमुख याने म्हटले आहे. रितेशने मंगळवारी सकाळी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट केला.
रितेश देशमुख काय म्हणाला?
“दोन्ही हात वर करून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नाव मनावर कोरलेले असतात. लिहिलेले पुस्तक कोरलेले नाही”, असे रितेश देशमुख यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेक चाहत्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आठवणी लिहित, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करत आहेत.
लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण शहरात आले होते. यावेळी त्यांनी सभा घेत भाषण करताना उपस्थितांना संबोधित करताना दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर वक्तव्य केले. यामुळे लातुरमधील वातावरण तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
रविंद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले होते?
लातूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. काल भाजपाची बैठक होती, या बैठकीत भाषणावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल एक विधान केले आहे. “सर्वांनी दोन्ही हात ऊंच करून घोषणा द्यायची आहे, भारत माता की जय, वंदे मातरम्, वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, खरंतर आपल्या सर्वांचा उत्साह पाहिला तर लक्षात येतेय की, १०० टक्के विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, यात काही शंका नाही” असे विधान चव्हाण यांनी केले. या विधानाची राज्यात सुरू आहे.




