मुंबई | Mumbai
करोना काळ (Corona Pandemic) सुरू झाल्यापासून लोक बॉलिवूड अभिनेता (Sonu Sood) सोनू सूदबद्दल बरीच चर्चा करत आहेत. सोनू सूद करोनाच्या काळात ऑक्सिजनपासून ते हॉस्पिटलमध्ये बेड पुरवण्यापर्यंत मदत केली.
दरम्यान, सोनू सूद (Sonu Sood ) गेल्या आठवड्यांपासून एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. २० कोटी रूपयांची कर चोरी केल्याप्रकरणी सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर आला आहे. गत आठवड्यात आयकर विभागच्या टीमने त्याची कार्यालये, मालमत्ता आणि निवासस्थानी छापे मारले आणि सर्वत्र खळबळ उडाली. सोनूने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता पहिल्यांदा या प्रकरणावर त्याने मौन सोडले आहे.
तो लिहितो, ‘ प्रत्येकवेळी तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची गरज नसते. कारण काळ सर्व सांगतो. सुदैवाने मी माझ्या पूर्ण शक्तीनिशी आणि मनापासून भारताच्या लोकांची सेवा करू शकलो. माझ्या फाऊंडेशनचा एक एक रूपया अनमोल जीवन वाचवण्यासाठी आणि गरजूंसाठी आहे. अनेक प्रसंगी मी जाहिराती देणाºया ब्रँड्सनाही माझी फी दान देण्यास प्रोत्साहित केले आहे. जेणेकरून पैशांची कमतरता भासू नये. काही पाहुण्यांची आवभगत करण्यात मी काही दिवसांपासून व्यस्त होतो. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून तुमच्या सेवेत नव्हतो.परंतु आता पुन्हा तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी परत आलो आहे.’ असं म्हणत सोनूने दोन सुंदर ओळी लिहिल्या आहेत. “कर भला, हो भला, अंत भले का भला. जय हिंद” असं सोनू त्याच्या निवेदनात म्हणाला आहे.
दरम्यान या छाप्यात आयकर विभागाला प्रचंड करचोरीचे सबळ पुरावे मिळाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. करात फेरफार सोनू सूदच्या पर्सनल फायनान्सशी संबंधित आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, या अभिनेत्याने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून आपले बेहिशेबी उत्पन्न वळवले आहे. आतापर्यंतच्या तपासात टीमला २० बनावट रेकॉर्ड सापडले आहेत. आयकर विभाग आता सोनू सूदच्या चॅरिटी फाउंडेशनच्या खात्यांचीही चौकशी करत आहे.