मुंबई । Mumbai
मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री प्रिया मराठे यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्या ३८ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
प्रिया मराठे यांना काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. मात्र, त्यांनी त्यावर यशस्वीपणे मात केली आणि पुन्हा एकदा अभिनयाच्या जगात पदार्पण केले. नाटक आणि मालिकांमध्ये त्या सक्रिय झाल्या होत्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने पुन्हा डोके वर काढले. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचारांना त्यांचे शरीर साथ देत नव्हते. अखेर, मीरा रोड येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेत्री प्रिया मराठे या प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांची चुलत बहीण होत्या. प्रियाच्या निधनानंतर सुबोध भावे यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ” प्रिया मराठे ” एक उत्तम अभिनेत्री, काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार. पण माझ्यासाठी त्याही पेक्षा महत्त्वाच नातं तिच्या बरोबर होतं. प्रिया माझी चुलत बहीण. या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहेनत,कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या.प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सर च निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका या मधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली. पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही. ” तू भेटशी नव्याने ” या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघेहा भक्कमपणे तिच्याबरोबर होता. माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली. प्रिया तूला भावपूर्ण श्रद्धांजली तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना. ओम शांती, असे सुबोध भावे याने आपल्या पोस्टमध्ये मह्टले आहे.
प्रिया मराठे यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी ३ वाजता मीरा रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार आणि चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांनी अनेक लोकप्रिय मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते.




