अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
आढळगाव (ता. श्रीगोंदा) येथील ग्रामपंचायत सदस्यास बंदूकीचा धाक दाखवून त्यांचे अपहरण करणार्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. किशोर सोमनाथ सांगळे (वय 27, रा. सिध्दटेक, ता. कर्जत), सागर चिमाजी देमुंडे (वय 27, रा. आळसुंदे, ता. कर्जत), प्रतिक उर्फ सनी राजेंद्र पवार (वय 25, रा. सोनारगल्ली, ता. कर्जत), महेंद्र उर्फ गोट्या अरुण गोंडसे (वय 26, रा. जोगेश्वरवाडी, ता. कर्जत) अशी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत.
9 जुलै 2024 रोजी दीपक दादाराम राऊत (रा. आढळगाव) हे माहिजळगाव बायपास (ता. कर्जत) येथे पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबलेले असताना शिवप्रसाद उर्फ बंटी उबाळे व त्याचे इतर साथीदार वाहनांतून तेथे आले. त्यांनी दीपक राऊत यांना बंदूकीचा धाक दाखवून आढळगाव ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाचा अविश्वास ठराव मंजूर होऊ नये या उद्देशाने राऊत यांच्यासोबत वाहनात असलेल्या ग्रामपंचायत सदस्य नितीन बन्सी गव्हाणे यांना शिवीगाळ, मारहाण केली व त्यांचे वाहनातून अपहरण केले होते. या प्रकरणी राऊत यांच्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने या गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबीचे पोलीस करत होते.
पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार बबन मखरे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड व अरुण मोरे यांचे पथक यासाठी नियुक्त केले होते. पथकाने तांत्रिक विश्लेषण व संशयित आरोपींबाबत माहिती घेत असताना मंगळवारी (30 जुलै) निरीक्षक आहेर यांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार किशोर सोमनाथ सांगळे याने त्यांच्या इतर साथीदारांसह केला असून तो सिध्दटेक येथे आहे, अशी माहिती मिळाली. पथकाने सिध्दटेक येथे जाऊन किशोर सोमनाथ सांगळे याला ताब्यात घेतले.
त्याने अमोल भोसले व माऊली उर्फ ज्ञानेश्वर उबाळे यांच्या सांगण्यावरून साथीदार सागर देमुंडे, प्रतिक उर्फ सनी पवार व महेंद्र ऊर्फ गोट्या गोंडसे यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. पथकाने सागर देमुंडे, प्रतिक उर्फ सनी पवार, महेंद्र ऊर्फ गोट्या गोंडसे यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. दरम्यान, अमोल भोसले व माऊली उर्फ ज्ञानेश्वर उबाळे यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत. ताब्यात घेतलेल्या चौघांना गुन्ह्याच्या तपासकामी मिरजगाव पोलीस ठाण्यात हजर केले आहे.