मुंबई | Mumbai
पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून चार हजारांहून अधिक महिलांनी योजनेचा लाभ नको असा अर्ज केला आहे. सुरुवातीला लाडकी बहीण योजनेत सरसकट पैसे मिळत होते, मात्र निवडणुकीनंतर या योजनेसाठी दाखल केलेल्या अर्जांची फेरतपासणी होणार याची चर्चा सुरू झाली. अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने सरकार आपल्यावर कारवाई करेल, अशी भीती महिलांच्या मनात निर्माण झाली असून त्यामुळे अनेक महिलांनी लाडकी बहीणसाठी केलेल अर्ज मागे घेण्यास सुरूवात केली आहे. यावरून आता महिला व बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या योजनेसंदर्भात काही गोष्टी स्पष्ट केल्या. पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून चार हजारांहून अधिक महिलांनी ‘योजना नको’ असा अर्ज केला आहे. महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयांत योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज येत आहेत.
“आतापर्यंत चार हजार अर्ज मागे आले आहेत. परंतु, ही आकडेवारी अंदाजे आहे. डिसेंबरमध्ये १००-१५० प्राप्त झाले होते. जानेवारीत जास्त प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे. या महिलांकडून परत आलेला निधी पुन्हा सरकारी तिजोरीत देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र रिफंड हेड तयार करून त्या निधीचा उपयोग लोककल्याणासाठी केला जाणार आहे”, असे त्या पुढे म्हणाल्या.
“पिवळे आणि केशरी रेशनकार्डधारक प्राप्त लाभार्थी महिला वगळता इतर महिलांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. याकरता परिवहन आणि प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जात आहे. त्यामुळे ही अखंड अविरत सुरू राहणारी प्रक्रिया असेल. परिणामी अर्ज मागे घेण्याऱ्या महिलांच्या आकडेवारीत सतत बदल होऊ शकेल”, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
आदिती तटकरे म्हणाल्या की, “आता साडेचार महिला पुढे आल्या आहेत. त्यांनी अर्ज माघारी घेतले आहेत. आम्ही या महिलांचे पैसे परत घेणार नाहीत उलट इतर महिलांनीही पुढे येऊन अर्ज माघारी घ्यावेत. पडताळणीत जर काही त्रुटी आढळल्या तर त्या महिलांना याबाबत माहिती दिली जाईल. त्यानंतर या महिलांनी पैसे जमा केल्यानंतर ते सरकारी तिजोरीत जमा केले जाणार आहे.”
जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली, त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांना रमहा १५०० रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांना जुलै ते डिसेंबर अशा सहा महिन्यांचे एकूण ९ हजार रुपये देण्यात आले. मात्र या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर प्रचंड भार पडणार असल्यामुळे या योजनेतील लाभार्थींची पडताळणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला व बालविकास विभागाला केल्या होत्या. त्यानुसार, या विभागाकडून आता अर्जांच्या पडताळणीची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.