Monday, May 27, 2024
Homeदेश विदेशAditya-L1 ची यशस्वी घोडदौड सुरू; यशस्वीरित्या बदलली दुसरी कक्षा

Aditya-L1 ची यशस्वी घोडदौड सुरू; यशस्वीरित्या बदलली दुसरी कक्षा

मुंबई | Mumbai

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताने पाठवलेला पहिला उपग्रह ‘आदित्य एल-1’ हा पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत पोहोचला आहे. आज पहाटे 2 वाजून 45 मिनिटांनी आदित्यचे दुसरे अर्थ-बाउंड मॅन्यूव्हर पार पडल्याचं इस्रोने सांगितलं आहे.इस्रोने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरुन याबाबत माहिती दिली.

- Advertisement -

आदित्य L-1 आता 245 किमी x 22459 किमी कक्षेवरून 282 किमी x 40225 किमीवर गेले आहे. आदित्य एल-1 चे हे दुसरे मोठे यश असून त्याने आपले पाऊल सूर्याकडे वळवले आहे. आता 10 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 2:30 वाजता आदित्य-L1 ची कक्षा पुन्हा तिसऱ्यांदा बदलली जाईल. सूर्य मिशनच्या कार्यपद्धतीनुसार, आदित्य-एल 1 ला पृथ्वीभोवती 16 दिवस फिरायचे आहे, त्यानंतरच तो सूर्याच्या दिशेने त्याच्या मार्गावर जाईल. आदित्य L-1 16 दिवसांत पृथ्वीची कक्षा पाच वेळा बदलणार आहे. इस्रोच्या अपडेटनुसार, 5 दिवसांनी त्याची कक्षा पुन्हा बदलली जाईल.

आदित्य हा उपग्रह 18 तारखेपर्यंत पृथ्वीच्या कक्षेत असणार आहे. त्यानंतर तो अंतराळात असणाऱ्या एल-1 या लॅग्रेंज पॉइंटच्या दिशेने प्रवास करेल. पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या या पॉइंटवर आदित्य उपग्रह प्रस्थापित करण्यात येईल. यासाठी आदित्यला सुमारे चार महिने प्रवास करावा लागणार आहे.

आदित्य एल1 मिशनमध्ये एकूण सात पेलोड्स आहेत. त्यापैकी चार सूर्यापासून निघणाऱ्या किरणांचा अभ्यास करणार आहेत. तसेच पेलोड्स एल1ला लागून असलेल्या भागांचा अभ्यास करणार आहेत. सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण एकमेकांना संतुलित करते हा तो बिंदू आहे. या बिंदूवर स्थापित होण्याचा आदित्य L1 ला फायदा होईल. इथे ग्रहणाचा प्रभाव नाही. म्हणजेच आदित्य L1 ग्रहणाच्या प्रभावाशिवाय सूर्याची हालचाल सहज समजू शकेल. आत्तापर्यंत आदित्य मिशन आपल्या गंतव्यस्थानाकडे यशस्वीपणे प्रगती करत असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या