नागपुर । Nagpur
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी नागपुरात विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि अंतर्गत राजकारणावर थेट हल्लाबोल केला. सत्ताधारी पक्षातच दोन विरोधी गट निर्माण होण्याची भीती विद्यमान मुख्यमंत्र्यांना वाटत असल्यामुळेच विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद (LoP) रिक्त ठेवण्यात आले आहे, असा महत्त्वपूर्ण दावा त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षातील अंतर्गत स्थितीवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “सत्तेमध्ये सध्या एक पक्ष असून त्याचे दोन गट आहेत. त्यातील एका गटाचे २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या पूर्णपणे हाती लागले आहेत.” गेल्या एका वर्षातील या आमदारांच्या राजकीय वर्तनाचा अभ्यास केला असता, ‘ही मंडळी उठ म्हटले तर उठतात आणि बस म्हटले तर बसतात. ते मुख्यमंत्र्यांच्या केवळ एका इशाऱ्यावर नाचत आहेत,’ असे म्हणत त्यांनी या २२ आमदारांवर मुख्यमंत्र्यांचे पूर्ण नियंत्रण असल्याचे सूचित केले. विरोधी पक्षनेतेपदाच्या प्रस्तावामध्ये कुठलाही बदल झालेला नाही, त्यामुळे या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ‘उद्धव ठाकरे इंडिगोच्या विमानाने येत नाहीत’ या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी केलेली टीका ही इंडिगो कंपनीमुळे सामान्य प्रवाशांना झालेल्या त्रासाची थट्टा उडविण्यासाठी होती की मूळ ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी, याचा विचार करायला हवा, असे त्यांनी सुनावले. आदित्य ठाकरे यांनी आठवण करून दिली की, काल (रविवार) खुद्द मुख्यमंत्री चार्टर विमानाने आले होते आणि त्यांचे विमान दोनवेळा मुंबईला गेले होते. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि भाजपचे आमदारही चार्टर विमानाने आले होते.
नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रचारासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला. ते गाडीने का फिरले नाहीत, असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. ‘एका उपमुख्यमंत्र्यांच्या गावी जायला रस्ता नाही, पण तिथे हेलिकॉप्टर जाते,’ असा उपरोध त्यांनी साधला. प्रचारात काही तासांसाठी जाऊन ‘मोठाल्या बॅगांमधून कुठला आनंदाचा शिधा वाटत होते,’ याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. २०१४ पूर्वी वेगवेगळ्या एअरलाईन कंपन्या कार्यरत होत्या, पण त्यानंतर या कंपन्या संपवण्यात आल्यामुळे एका कंपनीची मक्तेदारी (Monopoly) झाली आहे. केंद्र सरकारचेदेखील ही कंपनी ऐकत नाही आणि सरकारसुद्धा त्यावर काही करत नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असतानाही सरकार अधिवेशन घेण्याबाबत गंभीर नाही, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. सरकारची नजर केवळ पैशांवर आहे, म्हणूनच अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवण्यात आला आहे, अशी टीका देखील त्यांनी केली. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विनाश सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी अनेक प्रकल्पांवर टीका केली. नाशिकमध्ये तपोवन आणि मुंबईमध्ये संजय गांधी उद्यानात वृक्षतोड होणार आहे. नागपूरमध्ये अजनीवन संपवण्याचा प्रयत्न होता, पण मी मंत्री असताना ते काम थांबवले होते. महामार्ग, बोगदे, रोपवे आदींच्या नावावर पर्यावरणाचे नुकसान कसे करायचे, हे भाजपला चांगले माहिती आहे. ताडोबामध्ये खनिकर्म सुरू होणार आहे आणि मेळघाटची वाट लावली आहे. ‘विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विनाश सुरू आहे,’ अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.




