छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
राज्याचे राजकारण प्रचंड वेगाने बदलत असल्याचे आपण पाहत आहोत. त्यामुळे राजकारणा कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. असाच एक प्रकार संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाघिणीच्या तीन बछड्यांचं बारसं झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पण, हा कार्यक्रम चर्चेत आला तो आदित्य नावामुळे! अजित पवारांनी काढलेल्या एका चिठ्ठीत निघालेल्या आदित्य नावामुळे राजकीय वैराची प्रचिती बघायला मिळाली.
वाघांच्या बछड्यांचे नामकरण करण्यासाठी कार्यक्रमस्थळी चिठ्ठ्यांनी भरलेली दोन काचेची पात्र ठेवण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासमोरील काचेच्या भांड्यातून पहिली चिठ्ठी उचलली. त्यामध्ये ‘श्रावणी’ असे नाव लिहले होते. त्यानुसार वाघाच्या मादीचं नामकरण ‘श्रावणी’ असे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी,’श्रावणात जन्माला आली म्हणून श्रावणी’, अशी शाब्दिक कोटीही केली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यासमोरील काचेच्या भांड्यातील चिठ्ठी उचलली. अजित पवारांनी उचललेल्या चिठ्ठीत ‘आदित्य’ हे नाव आले. हे नाव वाचताच अजित पवारांच्या चेहऱ्यावर हास्याची छटा पसरली. त्यांनी हसतहसतच ही चिठ्ठी शेजारी उभे असलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दाखवली.
कदाचित राजकीय कारणामुळे असेल, सुधीर मुनगंटीवार यांनी कोणाच्याही लक्षात येणार नाही, या अपेक्षेने वाघाचे नामकरण ‘आदित्य’ असे करण्यास नकार दर्शविला. एव्हाना हा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही लक्षात आला. एकनाथ शिंदे यांनी चपळाई दाखवत अजित पवार यांच्यासमोरील काचेच्या पात्रातून आणखी एक चिठ्ठी उचलली. त्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये आपापसात थोडीफार चर्चा झाली. यानंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा काचेच्या पात्रातून चिठ्ठी उचलली. त्यामध्ये विक्रम असे नाव आले. त्यानुसार दुसऱ्या बछड्याचे नामकरण विक्रम असे करण्यात आले. एकनाथ शिंदे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी चलाखीने ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी बाजूला सारली. मात्र, त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांमध्ये हा सर्व प्रकार टिपला गेला. त्यामुळे आता यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार, हे पाहावे लागेल.