पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पाथर्डी तालुक्यातील मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला होता. हा ठराव गटविकास अधिकार्यांनी रद्द केला असला तरी या विषयावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यासाठी शनिवारी (दि. 8) प्रशासनाने पाथर्डी पोलिस ठाण्यात बोलावलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत मार्ग निघाला नाही. यामुळे पुन्हा सोमवारी (दि.10) दोन्ही समाजातील प्रमुख व्यक्तींची बैठक बोलवण्यात आली आहे. यात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शनिवारी सायंकाळी पाथर्डी पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीस प्रांताधिकारी प्रसाद मते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, तहसिलदार उद्धव नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, संतोष खाडे, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, शिवशंकर राजळे, रफिक शेख, नासिर शेख, मढीचे सरपंच संजय मरकड, बबन मरकड, भगवान मरकड, सोमनाथ अकोलकर, सचिन वायकर, शन्नो पठाण, सुनील पाखरे, डॉ. विलास मताधिकार, अशोक पवार, भगवान बांगर, मन्सूर पठाण, नानासाहेब पालवे, फिरोज शेख, जुबेर आतार आदी उपस्थित होते.
बैठकीत मढी यात्रा शांततेत पार पाडावी, अशी आमची इच्छा असल्याचा सूर उपस्थितांनी आळवला, तर काहींनी वादग्रस्त विषय नेमके काय आहे, यावर भाष्य केले. यावेळी मन्सूर पठाण म्हणाले, आम्ही मढी येथे असलेल्या सर्व प्रथा आणि परंपरा पाळतो. देव एकच असून मार्ग वेगळे आहेत. मढीची यात्रा शांततेत पार पडावी. नानासाहेब पालवे म्हणाले, शांततेचा पुरस्कार आम्हीही करतो, मात्र मुस्लिम बांधवानी मढी येथील जमिनीच्या बाबतीत वक्फ बोर्डाकडे जायला नको होते. हा दावा आधी काढून घ्या, तर अशोक पवार यांनी मढी येथील जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले. रफिक शेख म्हणाले, मुस्लिम समाजाच्यावतीने काही चुकले असेल तर मी माफी मागतो. मात्र ही यात्रा तालुक्याचे वैभव आहे. अनेक गोरगरिब व्यावसायीकांनी या यात्रेसाठी माल भरून ठेवला आहे. चुकीचा संदेश गेल्यास सर्वांचे नुकसान होणार आहे. हिंदू-मुस्लिम असा भेद मी करत नाही. मी एका राजकीय पक्षाचा उपजिल्हा प्रमुख आहे. माझ्या पाच पिढ्या यात्रेत दुकान लावत असून सरपंच मरकड यांनी मनाचा मोठेपणा दाखवून वेगळा विषय काढू नये.
नासिर शेख म्हणाले, मढी यात्रेतून आपल्याला एकतेचा संदेश द्यायचा असल्याने सर्वांनीच सामंजस्याची भूमिका घ्यावी. सरपंच मरकड म्हणाले, हा विषय आता माझ्या अखत्यारीत राहिलेला नाही. या विषयावार दोन दिवसात सर्व बसून चर्चा करू व योग्य निर्णय घेऊ. प्रांताधिकारी मते म्हणाले, यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्वानी एकोपा दाखवावा. अतिरिक्त पोलीस अधीक्षक खैरे म्हणाले, सर्वांनी योग्य निर्णय घ्यावा. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलिस प्रशासन कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करेल. चर्चेअंती कोणताही ठोस निर्णय न होवू शकल्याने आता उद्याच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.