अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात अनॉलॉग पनीरच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. काही पनीर उत्पादकांकडून स्कीम मिल्क पावडर, दूध आणि तेल यांचे मिश्रण करून अनॉलॉग पनीर तयार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या पनीरच्या पॅकिंगवर ‘अनॉलॉग पनीर’ असा स्पष्ट उल्लेख न करता ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. हीच भेसळयुक्त पनीर उत्पादने हॉटेल व दुकानदारांना पुरवण्यात येत असून, हॉटेलमध्ये देखील रेटकार्डवर त्याचा उल्लेख न करता ग्राहकांना हेच पनीर सर्रास दिले जात आहे.
पनीरच्या गुणवत्तेबाबत वाढती तक्रार आणि ग्राहकांची फसवणूक लक्षात घेता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अन्न व औषध प्रशासनाला भेसळीविरोधात तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर प्रशासनाने जिल्ह्यात व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनीही यापूर्वी विधिमंडळात भेसळयुक्त पनीर उत्पादनाचा मुद्दा उपस्थित केला होता. अनेक हॉटेल चालकांकडून अशा भेसळयुक्त अनॉलॉग पनीरची सर्रास खरेदी करून ग्राहकांना दिली जात आहे.
मात्र ग्राहकांसाठी ठेवण्यात येणार्या रेडकार्डवर त्याचा उल्लेख नसल्याने, ग्राहक अनावधानाने हेच पनीर खाऊन आपल्या आरोग्याशी तडजोड करत आहेत. जिल्ह्यात भेसळयुक्त अनॉलॉग पनीरचा वापर वाढल्याने ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे संबंधित उत्पादन कंपन्या आणि हॉटेल्सवर वचक बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, ग्राहकांनी पॅकिंगवरील तपशील काळजीपूर्वक वाचावा आणि हॉटेलमध्ये दिले जाणार्या पनीर विषयी चौकशी करावी. अनधिकृत किंवा अनियमिततेची माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
30 नमुन्यांची तपासणी
अन्न व औषध प्रशासनाने मागील चार महिन्यांत जिल्ह्यातील 30 हॉटेल्स आणि पनीर उत्पादकांकडे धाड टाकून नमुने गोळा केले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असले तरी बहुतेक अहवाल प्रशासनाकडे अद्याप आलेले नाहीत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई होणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.
अनॉलॉग पनीर म्हणजे काय ?
अनॉलॉग पनीर हा नैसर्गिक पनीर नसून विविध घटकांपासून कृत्रिमरित्या तयार केला जातो. यात 60 टक्के स्कीम मिल्क पावडर, 40 टक्के दूध आणि सुमारे 5 किलो तेल यांचे मिश्रण असते. त्यामुळे त्याचा पोषणमूल्यांवर गंभीर परिणाम होतो. याचा सातत्याने वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, असे अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.