अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भेसळयुक्त अखाद्य तीळ तेलाची विक्री करणार्या मार्केटयार्ड परिसरातील साईबाबा एजन्सीवर येथील अन्न प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली. भेसळीच्या संशयावरून सुमारे 40 हजारांच्या तेलाच्या बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, या तेलाचे उत्पादन करणार्या कंपनीला विक्री बंद करण्याच्या व आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना अन्न प्रशासनाने केल्या आहेत. त्यांनी सुधारणा केल्या नाही तर त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिली.
मार्केटयार्ड येथील साईबाबा एजन्सी नावाच्या आस्थापनातून बनावट तीळ तेलाची विक्री होत असल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी बडे यांनी साईबाबा एजन्सीवर छापा टाकला असता त्या ठिकाणी आढळून आलेल्या तीळ तेलाच्या बाटलीवर ‘तीळ’ हा शब्द मोठ्या आकारात व ‘नॉट फॉर इडीबल युज’ (खाण्यायोग्य वापरासाठी नाही) छोट्या आकारामध्ये असल्याचे निदर्शनास आले. तसेच जाड आकाराच्या अक्षरामध्ये ‘तील तेल के गुणे युक्त’ असा उल्लेख आढळला. अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार सदर तेलाच्या बाटलीवर आवश्यक लोगो नमूद नसल्याचे आढळले.
त्यामुळे सदर अखाद्य तेल हे ‘दिये का तेल’ या कारणासाठी विक्री होत असले तरी ग्राहकांची दिशाभूल होऊन सदर तेलाचा अन्य प्रयोजनासाठी उपयोग होण्याची शक्यता अन्न प्रशासनाने व्यक्त केली. दरम्यान, सदर अखाद्य तेलाच्या बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. साईबाबा एजन्सी या आस्थापनातून विक्री होणार्या तीळ तेलावर बंदी घातली गेली आहे. संबंधित कंपनीला याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी बडे यांनी सांगितले.
सदर तेल हे तीळ तेल नसून ‘पॅराफीन’ ऑईल आहे. त्यामध्ये फक्त एक ते दोन टक्के तीळ तेल असण्याची शक्यता आहे. सदर पॅराफीन दिव्यासाठी वापरल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात धूर तयार होतो. तो धूर मानवी आरोग्यासाठी घातक आहे. तर काही ग्राहक या तेलाचा मालिशसाठी वापर करत असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी बडे यांनी सांगितले.