नवी दिल्ली | New Delhi
भारताचा शेजारी देश अफगाणिस्तानमध्ये (Earthquake In Afghanistan) शनिवारी (७ ऑक्टोबर) ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली असून मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या धक्क्यातून अफगाणिस्तान अद्याप सावरलेला नाही, तोच चार दिवसात अफगाणिस्तानमध्ये आणखी एक भूकंप असून पश्चिम अफगाणिस्तान ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने (6.3 Richter Scale Earthquake Hits Afghanistan) हादरला आहे. भूकंपाचे केंद्र वायव्य अफगाणिस्तानच्या दिशेने जमिनीपासून १० किमी खाली असल्याचे वृत्त आहे.
शनिवारी आलेल्या भूकंपामध्ये अत्तापर्यंत ४००० जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन हजारांहून अधिक घरेही उद्ध्वस्थ झाली आहे. गेल्या शनिवारी अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे तीन धक्के बसले. या तिन्ही भूकंपांची तीव्रता ६.३, ५.९ आणि ५.९ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपात अनेक गावे अक्षरशः भुईसपाट झाली आहेत. अफगाणिस्तान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ANDMA चे प्रवक्त्यांनी सांगितले की, आतापर्यंत २० गावांमधील दोन हजार घरे पूर्णपणे कोसळली आहेत. यामध्ये चार हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत.
प्रवक्त्याने सांगितले की, विविध संस्थांमधील ३५ बचाव पथकातील एकूण १००० हून अधिक बचाव कर्मचारी बाधित भागात मदत कार्य करत आहेत. अफगाणिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान मोहम्मद हसन अखुंद यांनी सोमवारी हेरात प्रांतातील प्रभावित भागाला भेट देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या एका गटाचे नेतृत्व केले.
तालिबान सरकारने दिलेल्या माहितीनुसार येथील २० गावांमधील तब्बल २००० घरे भुईसपाट झाली आहे. जून २०२२ मध्ये पूर्व अफगाणिस्तानात आलेल्या भूकंपात १,००० हून अधिक लोकांचा बळी गेला होता.