नाशिक | प्रतिनिधी
नासिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(निमा)च्या दिंडोरी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि.२० जुलै) सकाळी १० वाजता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. अशी माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि दिंडोरी उपसमितीचे अध्यक्ष नितीन वागस्कर यांनी दिली.
निमाची नाशिक आणि सिन्नर येथे अद्ययावत अशी कार्यालये असून आता त्यात दिंडोरी कार्यालयाची भर पडणार आहे. दिंडोरी तसेच आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विस्तार होत असून तेथील उद्योजकांना महावितरण, पायाभूत सुविधा,रस्ते, जिल्हा परिषद संलग्न विषय , ग्रामपंचायतीचे कर आदी समस्या मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहेत. मध्यंतरी काही विघातक शक्तींकडून उद्योजकांना धमकाविण्याचे प्रकारही घडले होते.
निमाने या प्रकरणात हस्तक्षेप करून त्याबाबत सामंजस्याने तोडगा काढला होता. भविष्यात असे प्रकार घडू नयेत आणि दिंडोरी व परिसरातील उद्योजकांचे प्रश्न तेथेच मार्गी लागावेत,त्यांना नाशिकला येण्याची गरज भासू नये यासाठी दिंडोरी येथे निमाचे कार्यालय उघडावे,अशी मागणी दोन महिन्यांपासून जोर धरू लागली या सर्व गोष्टींचा व नाशिक जिल्ह्यात होत असलेला पुढील औद्योगिक विकास येणाऱ्या काळामध्ये दिंडोरी-तळेगाव/ अक्राळे येथे मोठ्या प्रमाणात होणार आहे.
याआधीच रिलायन्स, इंडियन ऑइल तसेच अनेक मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले प्रकल्प उभारणीचे काम याठिकाणी सुरू केले आहेत, या सर्व बाबींचा विचार करून व दिंडोरीतील उद्योजकांना सोयीसुविधा त्याच ठिकाणी मिळाव्यात हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी कार्यकारणीच्या बैठकीत तातडीने हा विषय मांडून दोनच महिन्यांत कार्यालय उघडण्याचा संकल्प पूर्तीस गेल्याने आनंद व्यक्त केला.
विवेक पाटील व योगेश पाटील यांच्या अत्यंत महत्वपूर्ण सहकार्यामुळेच दिंडोरीवासीय,उद्योजक व निमाचे हे स्वप्न साकार झाले आहे,असेही बेळे आणि वागस्कर यांनी अभिमानाने नमूद केले. कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन निमाचे मानद सचिव राजेंद्र अहिरे,उपाध्यक्ष किशोर राठी,आशिष नहार,कोषाध्यक्ष विरल ठक्कर, सहसचिव हर्षद ब्राह्मणकर, दिंडोरी उप समितीचे को-चेअरमन योगेश पाटील, माधवराव साळुंके, तसेच सदस्य चंद्रकांत बनकर, निमा हाऊस कमिटी चेअरमन राजेंद्र वडनेरे, विवेक पाटील यांनी केले.