Saturday, July 27, 2024
Homeनगरअगस्ती प्रति टनास 50 रुपये जादा दर देणार - गायकर

अगस्ती प्रति टनास 50 रुपये जादा दर देणार – गायकर

अकोले |प्रतिनिधी| Akole

पुढील वर्षाकरिता उसाची उपलब्धता कमी असल्याने पुरेसा ऊस गाळपासाठी उपलब्ध व्हावा म्हणून दि. 1 मार्च 2023 नंतर राखलेल्या खोडवा तसेच नवीन लागवड केलेल्या सुरू उसासाठी सन 2023-24 चे गळीतासाठी उपलब्ध होणार्‍या उसाला प्रति मेट्रिक टन पन्नास रुपये जास्तीचा दर देण्याची घोषणा अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर यांनी केली.

- Advertisement -

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित शेतकरी संवाद दौर्‍यानिमित्त इंदोरी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदीर सभागृहात झालेल्या शेतकरी मेळाव्यात श्री. गायकर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रयोगशील शेतकरी सतीश नवले होते.

श्री. गायकर म्हणाले, 2500 मे. टन प्रतिदिन क्षमतेच्या साखर कारखान्याला पाच लाख मेट्रिक टन ऊस लागतो. गेल्या 28 ते 30 वर्षांत तो कार्यक्षेत्रात आपण उपलब्ध करू शकलो नाही याची खंत आहे. अगस्ती कारखान्याच्या निर्मितीपूर्वी ऊस उत्पादकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अकोल्यातील जिद्दी आणि मेहनती शेतकर्‍यांनी प्रसंगी ऊस दर कमी घेऊन अगस्ती वाचवण्याची कायमच भूमिका घेतली.

उसाला चांगला दर मिळाला तर कार्यक्षेत्रात ऊस पीक वाढणारच आहे, परंतु मागील पावसाळ्यात झालेला सातत्याने पाऊस, खोडव्याचे अधिक प्रमाण, तांबेरा रोगाचा प्रादूर्भाव या व इतर कारणांमुळे उसाचे क्षेत्र घटले. परिणामी पुढील वर्षीच्या गाळपासाठी कार्यक्षेत्रात ऊस कमी असला तरी पुढील हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. पुढील गळीताकरिता जास्तीचा ऊस कार्यक्षेत्रातच उपलब्ध व्हावा म्हणून कार्यक्षेत्रात 1 मार्च 2023 नंतर ठेवलेल्या खोडवा पिकाला व नवीन लागणीच्या सुरू पिकाला पुढील वर्षीच्या गाळपासाठी प्रचलित एफआरपीपेक्षा जास्तीचा 50 रुपये प्रति मेट्रिक टन दर उसाला देण्याचे धोरण घेतल्याचे गायकर म्हणाले.

शेतकर्‍यांच्या बांधावर बेणे पोहोच, प्रत्यक्ष शेतावर सेंद्रिय खतांचा पुरवठा, शेअर्स कपातीची रक्कम, ऊस तोडणीच्या अडचणीसह कारखान्याच्या संदर्भातील शंका, अडीअडचणी याबाबत शेतकरी सभासदांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांनी ऊस उत्पादक सभासद शेतकर्‍यांचे समाधान केले. ऊस उत्पादन वाढीसाठी सांगली कोल्हापूर भागातील शेतकर्‍यांचे मार्गदर्शन आपण घेतलेले आहे, तसेच राष्ट्रीय सहकारी मंडळाकडून कारखान्याला मदत मिळवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यासह सर्वांचे सहकार्य घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अगस्ती अकोल्याची कामधेनू असून ती टिकवण्यासाठी व वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार असून सर्व सभासद, ऊस उत्पादक, कामगार नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, समाजधुरीन यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे म्हणाले, कारखान्याने सुरू केलेल्या माती परीक्षण प्रयोगशाळेचा वापर करून अभ्यासपूर्ण उसाचे उत्पादन घ्यावे. शेतीतज्ञ किंवा ऊस तज्ञ यांची नेमणूक करावी, पुढील 10 वर्षांचा ऊस वाढीचा कृती आराखडा तयार करून तालुक्यात जास्तीत जास्त ऊस निर्माण करावा, स्व. अशोक भांगरे याच्या कल्पनेप्रमाणे आदिवासी विभागात ऊस वाढीसाठी आम्ही स्वतः प्रयत्न करू, अगस्ती कारखाना सर्वांच्या सहकार्याने सीताराम गायकर उर्जित अवस्थेत आणतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात कारखान्याचे केन मॅनेजर सयाजीराव पोखरकर यांनी ऊस बेणे योजना, ऊस रोपवाटिका, ऊस रोपांचा पुरवठा, ऊस बेणे बदल, रासायनिक खतांचा संतुलित वापर, ऊस पीक पोषणामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, एकरी 100 टन ऊस उत्पादन मिळवण्यासाठीचे प्रयत्न, फर्टिगेशन, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण, पाणी व्यवस्थापन तसेच कारखाना राबवीत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. पुढील गळीतासाठी जास्तीत जास्त ऊस उपलब्ध होण्यासाठी उधारीने लूज कंपोस्ट (अगस्ती बायोअर्थ), सुपर कंपोस्ट खत (सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त सेंद्रिय खत), नवीन लागवडीसाठी प्रोत्साहन योजना, यासह ऊस पीक व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले.

कारखान्याचे संचालक अशोकराव आरोटे यांनी, ऊस पीक आणि कारखान्याची परिस्थिती विषद करून भाजीपाल्याकडे न वळता शेतकर्‍यांनी कारखान्याच्या विविध योजनांचा फायदा घेऊन जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, असे आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मीनानाथ पांडे, अशोक देशमुख, अशोक आरोटे, विकास शेटे, सुधीर शेळके, बादशहा बोंबले, प्रदीप हासे, पाटीलबा सावंत प्रगतिशील शेतकरी देवराम सावंत, सुभाष येवले, गोपाळा वावळे, शिवाजी हासे, हिरामण भोत, शिवाजी आरोटे, बाळासाहेब कासार, शरद देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश नवले, फरगडे महाराज, भाऊ वाळुंज, महीपाल देशमुख, सुनील चौधरी, कार्यकारी संचालक अजित देशमुख, मुख्य लेखापाल एकनाथ शेळके, मुख्य शेतकी अधिकारी सतीश देशमुख तसेच शेतकरी सभासद, ऊस उत्पादक, कारखान्याचे कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत नेहे, नामदेव आरोटे, मनोहर मालुंजकर, विकास देशमुख, कैलास फरगडे, भाऊसाहेब कासार, कैलास आरोटे, श्री. बंगाळ, सचिन जोशी यांनी चर्चेत भाग घेतला. चंद्रकांत नवले यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या