Tuesday, July 16, 2024
Homeनगर‘अगस्ति’ कर्जमुक्त करून स्वयंपूर्ण करा - अजित पवार

‘अगस्ति’ कर्जमुक्त करून स्वयंपूर्ण करा – अजित पवार

अकोले |प्रतिनिधी| Akole

- Advertisement -

साखर निर्यातीसाठी कोटा पद्धत लागू करू नये तसेच साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून निर्माण होणार्‍या वीज खरेदी दरात वाढ करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते ना. अजित पवार यांनी केली. अगस्ती कारखान्याला जिल्ह्यात एक नंबर भाव कसा देता येईल यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करावेत, जर माझ्या सूचनांचे पालन झाले नाही तर येथे सभा घेऊन आपण या संचालक मंडळाला निवडून देऊन चूक केली असे जाहीररित्या सांगू, असा इशाराही पवार यांनी दिला.

अगस्ति सहकारी साखर कारखान्याचा 29 वा ऊस गळीत हंगाम व आसवणी प्रकल्प शुभारंभ राज्याचे विरोधी पक्षनेते ना. अजित पवार यांच्याहस्ते व आ. डॉ. किरण लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना स्थळावर पार पडला. यावेळी मार्गदर्शन भाषणात अजित पवार बोलत होते.

यावेळी माजी आमदार, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर घुले पाटील, बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संचालक प्रशांत गायकवाड, उत्तर नगर शिवसेना प्रमुख रावसाहेब पाटील खेवरे, अगस्तीचे अध्यक्ष सिताराम पा.गायकर, उपाध्यक्ष अशोकराव भांगरे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीपराव वर्पे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, माजी अध्यक्ष प्रकाशराव मालुंजकर, गुलाबराव शेवाळे, ज्येष्ठ नेते कॉ. कारभारी पा. उगले, विजयराव वाकचौरे, ज्येष्ठ संचालक कैलासराव वाकचौरे, परबतराव नाईकवाडी, अशोकराव आरोटे, अशोकराव देशमुख, रामनाथ वाकचौरे, यमाजी लहामटे, मच्छिंद्र धुमाळ, कैलासराव शेळके, पाटीलबा सावंत, विक्रम नवले, प्रदीप हासे, विकास शेटे, मनोज देशमुख, सचिन दराडे, बादशहा बोंबले, सौ. सुलोचना नवले, सौ. शांताबाई वाकचौरे, कार्यकारी संचालक अजित देशमुख यांचेसह अमित भांगरे, मारुती मेंगाळ, जे. डी. आंबरे, विठ्ठलराव चासकर, सोन्याबापू वाकचौरे, भाऊपाटील नवले, रमेश देशमुख, सुरेश गडाख, रामहरी तिकांडे, शरद देशमुख, सुशांत आरोटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

अन्य कारखान्यांशी तुलना करत अगस्तीचा खर्च कसा अव्वाच्या सव्वा आहे हे ना. पवार यांनी उदाहरणे देत स्पष्ट केले. अगस्तीचा साखर उत्पादन खर्च राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. मोलासेस स्टील टँक व अन्य कामासाठी घेतलेले कर्ज अन्य कामांसाठी वापरले. त्यामुळे व्याजाचा बोजा वाढला. हे कारखाना कामकाजा बाबतचे तज्ञांचे अभिप्राय त्यांनी निदर्शनास आणून दिले. कारखाना चालविणे हे येरागबाळ्याचे काम नाही. पुढारीपण करणे वेगळे आणि कारखाना चालविणे वेगळे असे सांगताना राजकीय जोडे बाजूला ठेऊनच कारखान्याचे कामकाज करा. एकोप्याने काम करा. ज्या कामासाठी कर्ज घेतले त्या कामासाठीच त्याचा वापर करा. स्टोअर मर्यादित ठेवा. जिल्ह्यात सर्वाधिक भाव कसा देता येईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आ. डॉ. किरण लहामटे म्हणाले, कारखाना निवडणुकीपुर्वी विरोधकांनी मुळा, आढळा पाणी पेटवण्याचा प्रयत्न केला पण तोही फोल ठरला. कारखान्याला येण्यासाठीचे रस्ते कसे आहेत तेही सांगायला नको.राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रस्त्यासाठी 20 कोटींचा निधी दिला होता मात्र नगरपंचायतने एन.ओ.सी.दिली नाही म्हणून 10 कोटींचा निधी परत गेला. कोणतेही काम होऊ द्यायचे नाही ही माजी आमदारांची भूमिका आहे. सभासदांनी विश्वासाने कारखाना ताब्यात दिला आहे, तेव्हा या कारखान्यावरील कर्ज कमी करून उत्पादकांना चांगला भाव देऊ, लोकांच्या दिलेल्या प्रेमाला उत्तराई होऊ, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पा. गायकर म्हणाले, ना. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार्याने अगस्ती कारखाना कदापीही बंद पडू देणार नाही तर सक्षमपणे चालवू. कारखाना स्थापनेपासून 28 वर्षांत तालुक्यात 5 ते 6 लाख टन ऊस निर्माण होऊ शकला नाही. बाहेरील तालुका व जिल्ह्यातून ऊस आणावा लागला. एफ.आर.पी.व साखरेचे दर यात तफावत येत असल्याने तोटा झाला. सातत्याने शेतकरी पेमेंट, कर्मचारी पगार व एफ.आर.पी देण्यासाठी कर्ज वाढत गेले.

शेजारच्या कारखान्याशी स्पर्धा करताना एफ.आर.पी पेक्षा जादा दर द्यावा लागला. या हंगामात इथेनॅाल सुरू होत आहे. यातून नफा येईल व खर्च कमी करून कर्ज फेडण्याचा प्रयत्न करू. दिवाळीला कर्मचार्‍यांना एक पगार बोनस म्हणून दिला आहे तर सन 21-22 गळितास पुरविलेल्या उसाला कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना एफआरपीचे ऊस पेमेंट आठ कोटी रुपये नुकतेच बँकेत वर्ग केल्याचीही माहिती श्री. गायकर यांनी दिली.

प्रास्ताविक व स्वागत उपाध्यक्ष अशोकराव भांगरे म्हणाले, तालुक्यातील सभासदांनी परिवर्तन केले तर हे परिवर्तन काहींना मानवेना. त्यामुळे रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. टीका करत आहे मात्र त्याकडे लक्ष न देता तालुक्यात ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू करायचे आहे. उपसा सिंचन योजना सुरू करायच्या आहेत. तालुक्यातील हक्काचे पाणी आम्हाला मिळाले पाहिजे. शिस्तीने व काटकसरीने कारखाना चालवून शेतकर्‍यांना चांगला भाव देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, शेतकरी नेते डॉ. अजित नवले, कॉ. आर. डी. चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, प्रमोद मंडलिक, सुरेश नवले, शांताराम संगारे, भाऊसाहेब बराते आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन कारखान्याचे मुख्य लेखापाल एकनाथ शेळके व केन मॅनेजर सयाजीराव पोखरकर यांनी केले तर आभार ज्येष्ठ संचालक मिनानाथ पांडे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या