Thursday, September 19, 2024
Homeनाशिकगोदावरी नदीपात्रात उतरून आंदोलन

गोदावरी नदीपात्रात उतरून आंदोलन

- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

समस्त नाशिककरांच्या वतीने आज नाशिकच्या गोदावरी नदीच्या तीरावर असलेले पुरातन घाट अन् मंदिरे, समाध्या सुशोभीकरणाच्या नावाखाली उद्ध्वस्त करून टाकण्याचा स्मार्ट सिटीच्या धोरणाविरुद्ध गोदापात्रात उतरून अनोखे जलआंंदोलन करण्यात आले. नाशकात अशा प्रकारचे आंदोलन प्रथमच झाले.

गोदावरी सुशोभीकरणाच्या नावाखाली स्मार्ट सिटी, नाशिक महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागने मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि नासधूस केल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. नाशिक वाचवा! नाशिक वाचवा! नाशिक वाचवा! अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

श्री गंगा गोदावरी नदीच्या तीरावर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरणाच्या नावाखाली बांधकाम चालले आहे. सुशोभीकरण करण्याची मागणी कोणाची होती? स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यकक्षेत सदरचे काम येते का? इतक्या मोठ्या प्रमाणावर सरकारी पैसा खर्च होत असताना कोणत्याच अधिकार्‍यांनी त्याबाबत भूमिका स्पष्ट का केल्या नाहीत? पुरातत्त्व खात्याची, जलसंधारण खात्याची, नगररचना विभागाची परवानगी घेतली होती का? सदरचे बांधकाम हे नियमात आहे का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा त्यांनी बांधलेला तो सुंदर घाट नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न झाला आहे. गांधी तलाव चारही बाजूने आतील बाजूस जवळपास 14/ 14 फूट सिमेंट काँक्रिटचे ठोकळे टाकून पायर्‍या बनवल्या जात आहेत. एका बाजूला नदीपात्र सिमेंटमुक्त करायचे, त्याऐवजी सिमेंटचे थर पात्रात टाकून गोदावरी नदी प्रदूषित केली जात आहे. याचा परिणाम येथे अपघात व पात्र लहान झाल्यामुळे पाण्याच्या फुगवट्यामुळे पाणी रस्त्यापर्यंत जाणार आहे.

अतिरिक्त बांधकामामुळे रहदारीस अडचणी निर्माण होणार आहेत. गंगा-गोदावरी नदी व घाटाच्या छेडखानीमुळे सर्वच गंगा-गोदावरी व अहिल्या माता भक्त व्यथित झाले आहेत. त्यांच्या भावनेलासुद्धा छेद गेला आहे, असा आरोप या आंदोलनात करण्यात आला. या जनआंदोलनात समस्त नाशिककर मोठ्या संख्येने सहभागी झाले.

जलआंदोलनाचे नेतृत्व नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, पंचवटी फोरमच्या प्रमुख कल्पना पांडे, धनगर समाज विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे आदींनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या