देश प्रगतीची नवनवी शिखरे गाठत आहे. देशात कोरोनाची साथ आहे. कोरोनावर स्वदेशी लस तयार झाली आहे. तिच्या मानवी चाचण्या सुरु आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करणार्या आरोग्य सेवकांना पीपीई कीट घालावे लागते. हे कीट घातल्यानंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यावर सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेने संशोधन केले. संस्थेने खादीचे पीपीई कीट तयार केले आहे. या कीटचा एक जोड तब्बल 20 वेळा वापरता येईल, असे संस्थेने म्हटले आहे. अशा अनेक क्षेत्रांमध्ये संशोधन आणि प्रगती सुरु आहे.
तथापि ही फक्त वरवरची प्रगती म्हणावी का? माणुसकी, सहकार्य, मदतीची भावना ही मानवी मूल्ये दुर्मिळ होत आहेत का? जादूटोणा करतात म्हणून चार व्यक्तींना जाळून ठार मारण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात राजापूर गावात घडली. तेथील एक महिला चार संशयितांपैकी एकाच्या घरी गेली होती. ती तेथे बेशुद्ध पडली. ती चार माणसे जादूटोणा करतात या संशयावरून 25-30 जणांच्या जमावाने चौघांना बेदम मारहाण केली. त्यांना बांधून ठेवले. त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी पोचले. त्यामुळे त्या चौघा संशयितांचा जीव वाचला. अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता. ती महिला अचानक बेशुद्ध का पडली? तिला भोवळ का आली? कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. बेशुद्ध पडलेल्या महिलेला विषाणूची बाधा झाली असेल का? अशा शंकाही कोणाला येऊ नयेत? केवळ जादूटोण्याचा संशय आला म्हणून माणसे आपल्यासारख्याच हाडामांसाच्या माणसाला जाळण्यास कसे प्रवृत होतात? उत्तर प्रदेशात अशा अनेक घटना घडत आहेत. महाराष्ट्र मात्र आपल्या प्रगतपणाची ग्वाही देत असतो. त्या महाराष्ट्रात एखाद्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याची अमानुष बुद्धी कशी होते? मानवी संवेदना कुठे हरवल्या? बंधूता, समता आणि मानवता ही भारतीय संस्कृतीची बलस्थाने मानली जातात.
‘हे विश्वची माझे घर ’ हे मूल्य भारतीय संस्कृतीने जगाला दिले. याचा सध्या केवढा गाजावाजा चालू आहे? या व अशाच सांस्कृतिक मूल्यांच्या बळावर ‘विश्वगुरुत्वाची’ स्वप्ने दाखवली आहेत. पण वास्तव जीवनात मात्र ही मूल्ये कशी आणि कुठे हरवली? माणसांचा चांगुलपणावरचा विश्वास उडत आहे का? अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकण्याएवढा पराकोटीचा द्वेष माणसा-माणसात कसा निर्माण झाला? चिथावणारे बाजूला नामानिराळे राहतात आणि निष्पाप माणसांची हकनाक हत्या व्हावी? चर्चेने, संवादाने प्रश्न सुटू शकतात, समस्यांवर उत्तरे शोधली जाऊ शकतात, यावरचा भरोसा अलीकडच्या काळात किती झपाट्याने ओसरत आहे. मानवी मनांच्या या अधःपतनाची जबाबदारी कोणाची? कोणत्याही मुद्यावरून समाजाला विघटनाच्या उंबरठ्यावर आणून उभे करण्याच्या अघोरी प्रयत्नांचा हा परिपाक मानावा का? समाजात असुरक्षिततेची व निराधार एकाकीपणाची भावना रुजवण्याचे व कट्टरतावाद पेरण्याचे पाप करताना त्याचे असेही परिणाम होतात, हे आता तरी लक्षात यावे.
माणसे एकमेकांपासून मनाने दूर जातील, मानवी मूल्यांवरचा विश्वास कमी होईल याचा, अंदाज कट्टरतावाद्यांना नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरावे. मानवी मूल्यांचे पतन समाजाला कोणत्या दिशेने घेऊन जाईल, हा विचारदेखील संवेदनशील माणसांना अस्वस्थ करणारा आहे. ज्या संस्कृतीचा व विश्वबंधुत्वाचा अभिमान भारतीयांनी मिरवावा, असे त्यांना सतत सांगितले जात आहे, त्याचाच हा परिणाम होऊ शकतो का? अभिमानाची दुराभिमानाकडे वाटचाल झाली तर काय घडू शकते, याची जाणीव आता तरी समाजाचे नेतृत्व करणार्यांना होईल का? देश सध्या कोरोनापेक्षाही जास्त गंभीर प्रतिकुलतेचा सामना करत आहे, एवढे जरी संबंधितांनी लक्षात घेतले तरच भारताला विश्वगुरुत्वावर दावा सांगता येईल.