Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखशालांत परीक्षा निकाल, गुणांची उधळण !

शालांत परीक्षा निकाल, गुणांची उधळण !

काल-परवा दहावीचा निकाल जाहीर झाला. या निकालाच्या टक्केवारीने नवा उच्चांक गाठला आहे. राज्यात 95 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागाचा निकाल 93 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी हीच टक्केवारी 77 टक्के होती. त्यामानाने यंदा विभागाने हनुमान उडी मारली आहे. राज्यातील सर्वच विभागांचा निकाल अशाच तर्‍हेने अपेक्षेबाहेर उंचावला आहे. 242 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत.

अनेक विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीशी झगडत यश मिळवतात. काही विद्यार्थी परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेतात. रात्र-रात्र जागून अभ्यास करतात. अशा विद्यार्थ्यांना आपल्याला किती गुण मिळणार आहेत याचा ठोस अंदाजही असतो. मेहनत करून यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा आनंदाचा क्षण असतो. तथापि यंदा मात्र राज्य परीक्षा मंडळाने निकालाचा नवाच विक्रम प्रस्थापित केला आहे. आपला पाल्य कदाचित दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणार नाही असे ज्या पालकांना वाटले होते त्यांनाही आपल्या मुलांना पडलेले गुण पाहून आनंदाचा धक्का बसणारच! अचानक एका वर्षात शिक्षणक्षेत्रात अशी क्रांती कशी झाली? निकालाची टक्केवारी गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 18 टक्क्यांपेक्षा जास्त कशी वाढली? राज्य परीक्षा मंडळाला हे औदार्य दाखवण्याची सद्बुद्धी कुठून मिळाली? सर्वच मुलांनी इतका अभ्यास केला असेल का? शिक्षणाचा दर्जा करोनाच्या काळजीने इतका उंचावला?

- Advertisement -

शिक्षणसंस्थांना किती जादा तास घ्यावे लागले असतील बरे? संबंधित सर्व शिक्षकांना करोना काळातही किती मेहनत घ्यावी लागली असेल? खासगी शिकवणी वर्गांनी मुलांकडून किती जादा प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या असाव्यात? शिक्षणसंस्था मार्चपासून बंद असूनही विक्रमी यश पदरात पडले ते अपेक्षित तरी होते का? दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द का करावा लागला? चालू शैक्षणिक वर्षही कधी सुरळीत सुरु होईल हे निश्चित कोणालाच सांगता येणार नाही. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाला आणि सरकारलाही विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागत होता. दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल काहीही करून घोषित करणे मात्र भागच होते. अशा परिस्थितीतून आपली मान सोडवून घेण्यासाठी राज्य शिक्षण मंडळ भरघोस निकालाने सर्व संबंधितांचे डोळे दिपवून मोकळे झाले असेल का? निकाल लावून मोकळे झाले का? असे अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहेत. राज्य शिक्षण, सीबीएसई आणि आयसीएसई या मंडळांचेही निकाल साधारणतः 95 टक्क्यांपेक्षा जास्त लागले आहेत. 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या आणि 50 ते 90 टक्क्यांदरम्यान गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या देखील प्रचंड आहे. त्या निकाला नंतरच्या विद्यार्थी प्रवेशाला पुरेशा जागा वाढवल्या आहेत का? नामांकित महाविद्यालयांची प्रवेश पात्रतेचा गुणांक सुद्धा यंदा बराच वाढेल.

तशीच अन्य महाविद्यालयांमध्येही प्रवेशासाठी स्पर्धा निर्माण होईल. अनेक विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीत यश मिळवले आहे. मुंबईच्या आस्मा शेखचे कुटुंब आझाद मैदान परिसरातील रस्त्यावर राहाते. तिला 40 टक्के गुण मिळाले आहेत. अशा मुलांना अकरावीला प्रवेश मिळण्याची आशा तरी करता येईल का? करोनामुळे परिस्थिती अस्थिर आहे. भविष्याच्या चिंतेने तरुणाईला काहीसे नैराश्य भेडसावत आहे. टक्केवारीच्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना गुणांक अनपेक्षित वाढले तरी पुढील शिक्षणाचे प्रवेश मात्र दुरावल्यामुळे तरुणाईवर नैराश्याचे ढग आतापासून घोंगावू लागले असतील अशी भीती अनेक पालक व्यक्त करत आहेत. 90 टक्के आणि 40 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सारखीच चिंता भेडसावणार असेल तर ’कशासाठी केला होता अट्टाहास?’ असा प्रश्न त्यांना पडला तर त्याचे समाधानकारक उत्तर त्यांना कोण देणार? मिळून करोना हे सुद्धा शिक्षण क्षेत्रातील गोंधळात नवी भर घालणारे निमित्त ठरणार का?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या