अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक होऊ लागली असून विक्रमी भाव मिळत आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळ कांद्याला जिल्ह्यात प्रति क्विंटल 7200 रुपयांपर्यंत तर लाल कांद्याला 5700 रुपयांचा भाव नोंदवला गेला आहे.
गत आठवड्यापासून उन्हाळी कांद्याची आवक घटू लागली असून लाल कांद्याची आवक हळूहळू वाढू लागली आहे. मागणी जादा असल्याने दोन्ही कांद्याचे भाव तेजीत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर बाजार समितीत लाल कांद्याची 2785 क्विंटल आवक झाली. 1800 ते 5700 रुपयांचा दर मिळाला. कोपरगाव बाजार समितीत 487 क्विंटल कांद्याची आवक झाली. भाव 1000 ते 4000 रुपये मिळाला. पारनेरात 3190 किंटल कांद्याची आवक झाली. 500 ते 5100 रुपयांपर्यंत दर मिळाला. राज्यात कोल्हापुरात सर्वाधिक दर मिळाला. येथे 3922 क्विंटल कांद्याची आवक झाली. भाव 1000 ते 7000 रुपयांचा होता.
उन्हाळी कांद्याला जिल्ह्यात पारनेरात सर्वाधिक दर मिळाला. 2425 क्विंटल आवक झाली दर 2500 ते 7200 रूपयांचा मिळाला. कोपरगावात 1000 ते 6027 रुपये, संगमनेरात 2000 ते 6100 रुपये दर होता. राज्यात सर्वाधिक भाव जुन्नर-ओतूर येथे मिळाला. येथील लिलावात उन्हाळी कांद्याला 7210 रुपयांचा दर मिळाला.