अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या तिसर्या हप्त्यासाठी 15 कोटी 15 लाख रुपयांच्या वितरणास राज्य शासनाने काल बुधवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकर्यांना ट्रॅक्टर, यंत्रे आणि अवजारे अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार असल्याची माहिती शासन निर्णयात देण्यात आली आहे.
2024-25 या आर्थिक वर्षात राज्यातील पात्र शेतकर्यांसाठी केंद्र सरकारने 9 कोटी 9 लाख रुपयांचा तर राज्य सरकारचा हिस्सा 6 कोटी 6 लाख रूपये असा एकूण 15 कोटी 15 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. मंजूर निधी कृषी आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे. यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी 5 कोटी, अनुसूचित जातीसाठी 5 कोटी 66 लाख 67 हजार रूपये आणि अनुसूचित जमातीसाठी 4 कोटी 48 लाख 33 हजार रूपयांची तरतूद केली आहे.