अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
यंदा खरीप हंगामाच्या सुरूवातीपासून कृषी विभाग जिल्ह्यात खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या काळाबाजार यासह अन्य गैरप्रकार करणार्या कृषी केंद्रांविरोधात आक्रमक असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात 15 भरारी पथकांमार्फत आतापर्यंत 652 कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक अकाले तालुक्यात 87 तर श्रीरामपूर तालुक्यात 85 आहेत. तर सर्वात कमी कोपरगाव तालुक्यात 15 आणि कर्जत तालुक्यात 25 यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्रीची 12 हजार 195 कृषी सेवा केंद्र आहेत. या सर्वांची कृषी विभागाच्यावतीने ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेली आहे. याठिकाणी बियाणे, खते आणि किटक नाशके यांची माहिती साठा, विक्री आणि शिल्लक मालाची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आलेल आहेत. मात्र, अनेक ठिकाणी विशेष करून बियाणे आणि खतांच्या खरेदी, विक्री आणि शिल्लक साठ्याच्या नोंदी ठेवण्यात आलेल्या नाही. यावरून याठिकाणी बियाणे आणि खतांचा काळाबाजार झाल्याचा संशय कृषी विभागाला आहे. यामुळे यातील 652 केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कृषी विभागाच्यावतीने पात्र असणार्यांना अर्ज केल्यानंतर कीटकनाशक विक्रीसाठी कायमस्वरूपी परवाना दिला जातो तर खते व बियाणांच्या परवान्यांचे दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागते.
तहसीलदारांच्या तालुकास्तरीय समितीने शिफारस केल्यानंतर जिल्हाधिकार्यांचे अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत परवाना वितरित केला जातो. पूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकार्यांमार्फत परवाने वितरित केले जात. आता हे अधिकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांकडे देण्यात आले आहेत. जिल्ह्यात नोंदणी असणारे अनेक कृषी सेवा केंद्र सातत्याने बंद, हंगामात क्वचितच कधीतरी ठेवणे, भाडोत्री चालवण्यास देणे, यासह काळाबाजार आणि निकृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठांची विक्री होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानूसार कृषी विभागाने धडक मोहीम राबवत तालुका पातळीवर 14 आणि जिल्हा पातळीवरील एक अशा 15 पथकांमार्फत प्रत्येक तालुक्यात तपासणी करण्यात आली. तपासणीचा अहवाल पाठवलेल्या परवानाधारकांना नोटीस पाठवून म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. सुनावणीमध्ये संशयास्पद प्रकार निदर्शनास आल्यानंतर परवाने कायम स्वरूपी रद्दची कारवाई करण्यात आली.
कायमस्वरूपी निलंबन
जिल्ह्यात कीटकनाशक विक्रीचे 3118, बियाणांचे 4889 व खत विक्रीचे 4098 असे एकूण 12 हजार 105 परवाने वितरित करण्यात आले आहेत. यापैकी कीटकनाशकांचे 211 खतांचे 195 व बियाणांचे 246 असे एकूण 652 परवाने कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई करण्यात आली. सर्वाधिक अकोले 87 व श्रीरामपूरमध्ये 85 तर राहुरी 66, नगर 63, पारनेर 63, पाथर्डी 26, कर्जत 25, श्रीगोंदे 58, जामखेड 31, शेवगाव 21, नेवासा 28, संगमनेर 51, राहता 33 आणि कोपरगाव तालुक्यात 15 परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी सुधाकर बोराळे यांनी दिली.