Monday, June 24, 2024
Homeनगरकृषी विभाग आक्रमक; 12 परवाने रद्द, 30 केंद्रांना नोटीस

कृषी विभाग आक्रमक; 12 परवाने रद्द, 30 केंद्रांना नोटीस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडत आहे. यामुळे 16 जूनपर्यंत अनेक ठिकाणी पेरणीपूर्व मशागतीसह पेरणीची तयारी शेतकर्‍यांनी सुरू केली आहे. बाजारपेठेत कपाशी, सोयाबीन यासह कडधान्य पिकांच्या बियाणांना मोठी मागणी आहे. यामुळे बियाणांचा काळाबाजार, चढ्या दराने विक्रीच्या तक्रारी वाढल्या आहेत. येणार्‍या तक्रारीनूसार आणि अचानक भेटीव्दारे कृषी विभाग कृषी केंद्राची तपासणी करत असून गेल्या महिनाभरात 12 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले असून 30 पेक्षा अधिक केंद्रांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. यासह तिन ठिकाणी थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्यापासून कृषी विभाग बियाणे, खते आणि किटकनाशकांचा काळाबाजार रोखण्यासाठी सरसावला आहे. मात्र, असे असले तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कपाशीसह अन्य बियाणांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. मागील आठवड्यात शेतकर्‍यांची पिळवूणक करणार्‍या कृषी केंद्र चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याच्या सुचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत. यासह यंदा बियाणे, खतांची टंचाई भासणार नाही, काळाबाजार होणार नाही, लिकींग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत. त्यानूसार कृषी विभाग सक्रिय झाला असून जिल्हा पातळीवरून स्वतंत्र आणि तालुका पातळीवर 14 अशा 15 पथकांव्दारे कृषी केंद्राची तपासणी करण्यात येत आहे.

याठिकाणी विक्रीसाठी येणारे बियाणे, विक्री झालेले बियाणे, शिल्लक साठा, त्यांचे बॅचनंबरसह अन्य माहिती अद्यावत न ठेवणार्‍या कृषी केंद्र चालकांवर तसेच काळाबाजार करणार्‍या विरोधात थेट कारवाई करण्यात येत आहे. यासह बियाणे आणि खतांसोबत किटक नाशकांचा दर्जा याची पडताळणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 313 बियाणांचे नमुने, 139 खतांचे नमुने आणि 62 खतांचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आलेले आहेत. यासह नेवासा तालुक्यात कपाशी बियाणांचा काळाबाजार करणार्‍या तिघांविरोधात पोलीस केस नोंदवण्यात आलेली आहे. तसेच नियमितता असणार्‍या 6 बियाण विक्री केंद्र यांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. यासह खतांचे 3 आणि किटकनाशकांचे 3 अशा ठिकाणी 12 कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. यासह 30 पेक्षा अधिक ठिकाणी नोटीसा बजावण्यात आल्या असून त्याठिकाणी समाधानकारक खुलासे न आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा गुणनियंत्रक ए. एस. ढगे यांनी सांगितले.

‘येथे’ कारवाई
काळाबाजार, चढ्या दराने बियाणे विक्री आणि रेकॉर्ड ठेवण्यात अनियमितता ठेवणार्‍या राहुरी, नेवासा, संगमनेर, अकोले याठिकाणी प्रधान्यांने कारवाई करण्यात आली असून उर्वरित तालुक्यात तपासणी सुरू असून अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या