नाशिक | Nashik
राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) शेतकऱ्यांच्या शेतात गेले होते. यावेळी त्यांनी ‘कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशांचे तुम्ही काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल करत शेतकऱ्यांना सुनावले होते. त्यामुळे कोकाटे यांच्यावर राज्यभरातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच विरोधकांनी देखील टीका केली होती. यानंतर अखेर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागितली आहे.
आज (६ एप्रिल) माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना त्यांच्या शेतकऱ्यांच्या विधानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, “काल अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मानसन्मान दुखावला गेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो”, असे त्यांनी म्हटले. गेले आठ दिवस महाराष्ट्रात (Maharashtra) अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाईल असेही त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांसाठी समृद्धी आणि सुख मिळावी अशी प्रार्थना केल्याचे कोकाटे यांनी म्हटले.
कोकाटे नेमकं काय म्हणाले होते?
शेतकऱ्यांना कर्जमाफी (Loan Waiver) मिळेल की नाही? असा सवाल एका शेतकऱ्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला होता. यावर उत्तर देताना कोकाटे यांनी शेतकऱ्यालाच सुनावले होते. ते म्हणाले होते की, “जे नियमित कर्ज भरतात त्यांनी का बरं कर्ज भरावं? कर्ज घ्यायचं आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची. तोपर्यंत कर्ज भरायचे नाही. मला एक सांगा, आता येथे मीडिया आहे. मीडियासमोर असं बोलत नाही. पण तुमची (शेतकऱ्यांची) कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का? सरकार तुम्हाला आता शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे. सरकार तुम्हाला पाईपलाईनाला पैसे, सिंचनासाठी पैसे, शेततळ्यासाठी पैसे देणार आहे. सरकार भांडवली गुंतवणूक करते. मग शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का? शेतकरी म्हणतात, पीक विम्याचे पैसे पाहिजे, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा”, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले होते.
आधीही शेतकऱ्यांबाबत केले होते वादग्रस्त विधान
मंत्री कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणले होते की, “हल्ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली. ही योजना चांगली आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. पण, या योजनेलाही गैरव्यवहाराचे ग्रहण लागले. यामुळे सरकार अडचणीत आलेले नाही, पण यातून आता काही सुधारणा निश्चितपणे कराव्या लागणार आहेत. ही योजना सरकारला कोणत्याही स्थितीत बंद करायची नाही. त्यात सुधारणा करायची आहे”, असे म्हटले होते. यावरून कोकाटे यांच्यावर शेतकऱ्यांसह विरोधकांनी टीका केली होती.