सिन्नर |प्रतिनिधी | Sinnar
सिन्नर शहरासह (Sinnar City) तालुक्यात अवघ्या दीड तासात विक्रमी १५० मि.मी. पाऊस पडल्यानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळेल. मात्र, काढून ठेवलेल्या शेतमालाचे पंचनामे होणार नाहीत. तशी तरतूद नसल्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी सांगितले. त्यावर शेतातलेही पंचनामे करा, अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांमधील एकाने करताच ‘आता काय ढेकळांचे पंचनामे करायचे का?’ असा सवाल कोकाटे यांनी केला. त्यावर राज्यभर उलट-सुलट चर्चा होत आहेत.
या अवकाळी पावसात (Unseasonal Rain) बसस्थानकाचे पॅराफिट वॉल पडल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकाटे बसस्थानकावर (Bus Stand) आले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांशी संवाद साधत असतानाच तेथे उपस्थित असलेल्या एका कार्यकर्त्याने पावसाने नुकसान झालेल्या शेतमालाच्या पंचनाम्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर शेतातील उभ्या पिकांचे पंचनामे करता येतील. मात्र, आता शेतात पिके कुठे आहेत? ढेकळांचा पंचनामा करायचा का असा उलट प्रश्न कोकाटे यांनी केला.
दरम्यान, त्यांचे हे वक्तव्य समाजमाध्यमांवर (Social Media) व्हायरल झाल्याने कोकाटे पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडून ट्रोल होत आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अपेक्षा असतांनाच कृषीमंत्र्यांचे (Agriculture Minister) असे वक्तव्य आल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे.





