अहिल्यानगर । चोंंडी| प्रतिनिधी| Ahilyanagar
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते. सूतगिरणीमुळे परिसरात रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून नवीन रस्त्यामुळे दळणवळण सुलभ होणार आहे. चौंडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या या सूतगिरणीसाठी 91 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली असून कापूस उत्पादक शेतकर्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू दरम्यानचा रस्ता साकारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य शासनाने 3 कोटी 94 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. हे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणी याच रस्त्यावर असल्याने 5.50 मीटर रुंद डांबरी रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. पाच वर्षांसाठी देखभाल व दुरुस्ती खर्चासाठी आवश्यक निधीची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे. यावेळी चौंडी येथे मंत्री परिषद बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन करण्यात आले. पुणे विभागाचे टपाल सेवा संचालक अभिजीत बनसोडे यांनी यातील पहिला अल्बम मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. टपाल विभागाने प्रकाशित केलेल्या या विशेष टपाल आवरणाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
चौंडी येथील मंत्री परिषद बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्मित आणि जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मृद व जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार, जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना यांसारख्या इतर योजनांच्या अंमलबजावणीत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. पुस्तिकेत जिल्ह्याच्या या यशाची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात जलसंधारणाची उत्तम कामे करणार्या गावातील यशोगाथांचा समावेशही या पुस्तिकेत करण्यात आला आहे.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व सर्व मंत्री आणि आमदारांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. धनगर समाजाच्या परंपरेनुसार काठी, घोंगडे, अहिल्यादेवींची मूर्ती, गौरवगाथेची पुस्तिका व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. गावातील ढोल-ताशांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. चोंडी येथे बैठक पार पडण्यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चापडगाव येथून चौंडीपर्यंत पाच किमी अंतरात कडक पोलीस बंदोबस्त होता. चौंडी व चापडगाव ग्रामस्थांनी स्वागतासाठी फलक व आकर्षक सजावट केली होती.
मंत्रिमंडळ बैठकीच्या ठिकाणी सभापती शिंदे व गावकर्यांच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अहिल्यानगर- सोलापूर रस्त्यावरील चापडगाव येथून पाच किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र चौंडी हे तिर्थक्षेत्र आहे. चापडगाव येथे पोलिसांनी बॅरेकेटींग केले होते. बैठकीसाठी येणार्यांची विचारणा केली जात होती. त्यानंतर त्यांना आत सोडले जात होते. चापडगाव, चौंडी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री ,दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्र्यांच्या स्वागताचे बोर्ड उभारले होते.
सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त
बैठकीसाठी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे दोन दिवसांपासून चौंडीमध्ये तळ ठोकून होते. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली एक हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. सोलापूर महामार्गावरील हॉटेल, धाबे व नाश्त्याची ठिकाणे बंद ठेवण्यात आली होती. मात्र, या बंदमुळे सुरक्षारक्षकांना अपुरा नाश्ता मिळाल्याने धावपळ उडाली.
स्मारक परिसरातील कामाची पाहणी
मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आणि त्याच परिसरात असलेल्या महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. चौंडी येथील स्मारक परिसरात सुरू असलेले गढीचे नूतनीकरण, नक्षत्र उद्यान, संरक्षक भिंत, शिल्प, संग्रहालय, शिवसृष्टी या प्रगतीपथावरील कामांची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. अहिल्यादेवी यांचे निवास, स्वयंपाकघर, देवघर, ओसरी, तुळशी वृंदावन, बैठकीचे ठिकाण, धान्य साठविण्याचे ठिकाण, दरबार या स्थळांची पहाणी मंत्र्यांनी केली.