अहिल्यानगर (प्रतिनिधी)
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीसह पुरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नुकसान भरपाई दिली जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ई-केवायसीसह तांत्रिक कारणामुळे तब्बल १ लाख ९३ हजार ६०३ शेतकरी या नुकसान भरपाईच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांची १४८ कोटी ३४ लाख रूपये शासनाच्या तिजोरीतच अडकून पडले आहेत. या शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे जिल्ह्यातील १४ तालुक्याचा नुकसान भरपाईत समावेश करण्यात आला होता. या १४ तालुक्यातील ८ लाख २७हजार ११८ शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाले होते. राज्य शासनाने या अतिवृष्टी व पुरस्थितीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. निधी उपलब्ध करून दिवाळीपूर्वी देण्याचे शासनाने जाहीर केले. त्यानुसार निधी वाटप देखील करण्यात आहे.
जिल्ह्यात ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांसाठी ८४६ कोटी ९६ लाख निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी आतापर्यंत ६ लाख ३३ हजार ५१५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईची मदत जमा झाली आहे. अशी ६९८ कोटी ६२ लाख रूपये या शेतकऱ्यांना दिले आहेत. मात्र, ई-केवायसी, तांत्रिक कारणासह सामाईक क्षेत्राचे संमतीपत्र न देणे, बँकांची माहिती न देणे, बाहेरगावी असणे, या कारणामुळे अजूनही १ लाख ९३ हजार ६०३ शेतकरी १४८ कोटी ३४ लाख मदतीपासून वंचित राहिले आहेत.
नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने फार्मर आयडी बंधनकारक केले होते. परंतू बहुतांश शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्याने ते मदतीपासून वंचित राहिले होते. त्यामुळे शासनाने नियमांत शिथिलता आणून ई-केवायसी बंधनकारक केले. ई- केवायसीसाठी राज्य शासनाने शिबीरे घेतली आहेत. परंतू अजून नुकसान भरपाई न दिलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे बि-बियाणे, खते घेता आली नसल्याची त्यांची खंत आहे. शासनाच्या पोर्टलवर ही रक्कम अदा झालेली दिसत आहे. मात्र केवळ ई-केवायसी, फार्मर आयडीमुळे ही रक्कम लटकली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही रक्कम अदा करण्यासाठी धडपड चालू आहे. गावनिहाय शिबिर सुरू केले आहेत. ई-केवायसी नसली तरी आता फार्मर आयडी शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे.
सर्वाधिक वंचित कर्जत तालुक्यात
जिल्ह्यात नुकसान भरपाईच्या मदतीपासून कर्जत तालुक्यातील शेतकरी सर्वाधिक वंचित आहेत. या तालुक्यात ३९ हजार ५९ शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. तालुकानिहाय वंचित शेतकऱ्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे. अहिल्यानगर ५ हजार ७२१, अकोले ६०६, जामखेड १५ हजार ९७६, कोपरगाव ७ हजार २५३, नेवासा १८ हजार ३०५, पारनेर १२ हजार १६७, पाथर्डी ३७हजार ५०६, राहाता ८ हजार ४३५, राहुरी ७ हजार ८०, संगमनेर ३ हजार ८१४, शेवगाव १७ हजार ३६४, श्रीगोंदा १० हजार ४८०, श्रीरामपूर ९ हजार ८९१ असे आहेत.




