अहिल्यानगर (प्रतिनिधी)
सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील पोलिस विभागाच्या 12 एकर जागेच्या काही गुंठ्यामध्ये बांधकाम व्यावसायिकाने ‘ताबेमारी’ करून तेथे बंगले (रो- हौसिंग) आणि 60 फ्लॅटची एक इमारत उभी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
दरम्यान, सदरच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस दलाने हालचाली सुरू केल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांना पोलिस ठाण्यात बोलून घेत त्यांना अतिक्रमण काढून घेण्याची तोंडी सुचना करण्यात आली. तसेच सदरची जागा 30 दिवसात खाली करावी, अतिक्रमण न काढल्यास आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदरची जागा सक्तीने खाली करून घेण्यात येईल अशी नोटीस संबंधीतांना दिली जाणार आहे. तशी कार्यवाही पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकासह तेथील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.
तपोवन रस्त्यावरील गट क्रमांक 50/2 व 55/7 मधील 12 एकर जागा पोलिस उपमुख्यालय म्हणून ओळखली जाते. ती जागा सध्या मोकळीच आहे. पूर्वी तपोवन रस्ता अस्तित्वात नसल्याने या जागेसाठी स्वतंत्र्य रस्ता त्या 12 एकर मधून निर्माण केला गेला होता. तो जुना पिंपळगाव माळवी रस्त्याला जोडला गेला आहे. हा रस्ता गट क्रमांक 55/7 मध्ये आहे. दरम्यान, त्या लगतच गट क्रमांक 56 असून ती खासगी व्यक्तीची जागा आहे. या जागेची मोजणी तात्कालीन भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांनी केली होती.
गट क्रमांक 56 मधील खासगी जागा एका बांधकाम व्यावसायिकाने विकसित करण्यासाठी घेतली होती. त्या बांधकाम व्यावसायिकाने ही जागा विकसित करताना तेथे चार बंगले (रो हौसिंग) उभे केले तसेच एक 60 फ्लॅटची भव्य इमारतही बांधली. त्याची विक्री केली असून ते नागरिकांनी खरेदी करून तेथे राहण्यासाठी गेले आहे.
दरम्यान, ते बांधकाम करत असताना पोलीस विभागाच्या गट क्रमांक 55/7 मधील 39 गुंठ्या पैकी सुमारे 25 ते 30 गुंठे जागा बळकावली गेली आहे. भूमी अभिलेख कार्यालयामार्फत दोन वेळा केलेल्या मोजणीतून हा सर्व प्रकार समोर आला आहे. तिसर्यांदा केेलेल्या मोजणीतून हद्द निश्चित करून घेतली आहे. त्या हद्द निश्चितीवर पोल रोवण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. तसेच तेथील बंगले व फ्लॅटची इमारत खाली करण्याचा हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.
मोजणी करून हद्द निश्चित केल्यानंतर पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. संबंधीत दोघा बांधकाम व्यावसायिकांना पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी बोलून घेतले होते. त्यांना सदर जागेत अतिक्रमण झाले असल्याचे सांगण्यात आले. तसेच ते अतिक्रमण काढून घेण्याची तोंडी सुचना देण्यात आली. दरम्यान, पोलिसांकडून संबंधी बांधकाम व्यावसायिक, बंगले व फ्लॅट धारकांना नोटीस दिली जाणार आहे. पोलिसांनी नोटीस तयार केली आहे. त्याची बजावणी आज (शनिवार) करण्यात येणार आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, गट क्रमांक 55/7 मधील पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या नावावर असलेल्या जागेवर आपण अतिक्रमण करून बांधकाम केलेले आहे. सदर अतिक्रमीत जागा तात्काळ खाली करण्यासाठी आपणास सदरची नोटीस देण्यात येत आहे. ती नोटीस प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत अतिक्रमीत केलेली पोलिस विभागाची जागा खाली करावी, आपण दिलेल्या कालावधीत केलेले अतिक्रमण न काढल्यास आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदरची जागा सक्तीने खाली करून घेण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशी नोटीस संबंधीतांना बजावली जाणार आहे. पोलिसांनी तशी नोटीस तयार केली असून आज त्या नोटीसा संबंधीतांना बजावल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
फ्लॅट धारकांत खळबळ
मोजणी केल्यानंतर अतिक्रमण झाल्याचे लक्ष्यात आल्याने पोलिसांनी पुढील कार्यवाही तात्काळ सुरू केली आहे. हद्द निश्चितीच्या ठिकाणी पोल रोवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार ते बंगले व फ्लॅट खरेदी केलेल्या व्यक्तींच्या लक्ष्यात आल्याने त्यांच्यात खळबळ उडाली आहे. त्यांनी बांधकाम व्यावसायिकाशी संपर्क साधला आहे. या सर्व गोंधाळात तेथील बंगले व फ्लॅट धारकांची मोठी अचडण निर्माण झाली आहे.