अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध सवलती दिल्या जात आहेत. आता महामंडळाने बस स्थानकांमध्ये आरोग्य सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने राज्यातील 343 बस स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र नावाने दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात नगर जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांवर हे केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी आवश्यक असणारी माहिती, जागेची उपलब्धता एसटीच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून मागवण्यात आली होती. ही माहिती पाठवण्यात आली असल्याची माहिती एसटीच्या नगर विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्यातील बसस्थानकांच्या ठिकाणी सर्व नागरिक, प्रवाशांना डॉक्टरांच्या सल्ल्यासह कमी दरात विविध चाचण्या आणि औषधे देण्याचा निर्णय एसटी महामंडळ आणि राज्य सरकारच्या विचारधीन होता. यासाठी सरकारच्या आदेशानंतर एसटी महामंडळाच्या मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून जिल्ह्यातील नगर शहरातील 3 आणि तालुक्याच्या ठिकाणी असणार्या बसस्थानकांवर उपलब्ध जागेची माहिती मागवली होती. एसटी महामंडळाच्या बसस्थानकात नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या आनंद आरोग्य केंद्रासाठी प्रत्येक ठिकाणी 300 स्वेअर फुटची जागा उपलब्ध आहे? याबाबत मध्यवर्ती कार्यालयाकडून राज्यातील सर्व विभागातील एसटी महामंडळाकडे विचारणा करण्यात आली होती.
याबाबतची माहिती मागील आठवड्यात एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयास सादर करण्यात आली असल्याचे नगर विभागाच्या सुत्रांनी सांगितले. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन एसटी महामंडळाची लालपरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात धावत आहे. त्यामुळे प्रवासीही वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन, अशी भूमिका घेत आहेत. सुरक्षित प्रवासाची हमी असल्याने अनेकजण एसटीला प्राधान्य देतात. दरम्यान, शासनाने विविध घटकांतील प्रवाशांसाठी प्रवासात सवलती दिल्याने दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. त्यातच आता महामंडळाने बस स्थानकात प्रवाशांना आनंद आरोग्य केंद्र नावाने दवाखाना सुरू केला जाणार आहे. लवकरच प्रवाशांच्या सेवेत आरोग्य केंद्र सुरू होणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान आता आरोग्यसेवेचाही लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
चालक, वाहकांची मोफत तपासणी
एसटीच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी चालक, वाहकांवर मोठी भिस्त आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी 40 वर्षांवरील चालक-वाहकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यात सीबीसी, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, ईसीजी, मॅमोग्राफी (महिलांसाठी) आदींची बस स्थानकातच तपासणी केली जाणार आहे. एसटीच्या सर्व बस स्थानकांत आनंद आरोग्य केंद्र नावाने दवाखाना सुरू केला जाणार आहे. यात माफक दरातप्रवाशांच्या आरोग्य चाचण्या, औषधी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.