पुणे/अहिल्यानगर |प्रतिनिधी| Pune | Ahilyanagar
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. तसेच उत्तर भारतासह अनेक राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटांचा इशारा देण्यात आलाय. उत्तरेकडील शीत वार्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान 10 अंशाच्या खाली गेल्याने नागरिकांना हुडहुडी भरलीय. केंद्रीय हवामान खात्याने उत्तर भारतात थंडीचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पारा हा 10 अंशाच्या खाली आहे.
भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतात थंडीचा अलर्ट जारी केलाय. या भागात बहुतांश क्षेत्रामध्ये दाट धुक्याचा अलर्ट देण्यात आला असून पर्वतीय क्षेत्रांवर सक्रिय होत असणार्या पश्चिमी झंजावातामुळे उत्तरेत काही ठिकाणी पावसाचाही अंदाज आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा चंदीगडमध्ये दाट धुक्याची चादर कायम राहणार असून उत्तरेतील शीतलहरी हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम राहणार आहे.
राज्यात येत्या 24 तासात गारठा वाढणार असून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या शेवटी राज्यभरात नागरिकांना थंडीचा सामना करावा लागणार आहे. नववर्षातही थंड व कोरडे जमिनीलगत वारे उत्तरेकडून खाली येत असल्याने उत्तर महाराष्ट्र मुंबईसह लगतच्या काही भागांमध्ये तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.
शेकोट्या पेटल्या
नगर जिल्ह्यात सध्या थंडीच्या लाटेचा इशारा नसला तरी दिवसागणित गारठा वाढताना दिसतोय. शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे. सध्या पहाटे आणि संध्याकाळी वाढणार्या गारठ्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. नगरसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट होत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. येत्या पाच दिवसात राज्यातील हवामान कोरडे राहणार असून नवीन वर्षात नागरिकांना गारठा जाणवू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
अहिल्यानगर ऽ 7.4
राज्यातील बहुतांशी भागात शनिवारी किमान तापमान शनिवारी स्थिर दिसले. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील थंडी काहीशी अधिक आहे. यात अहिल्यानगर येथे 7.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 7.4 अंश तापमान होते. तर गोंदीया येथे 9.2 तसेच मोहोळ येथे 9.3 अंश तापमानाची नोंद झाली होती. यासह अनेक ठिकाणी तापमान 10 ते 12 अंशाच्या दरम्यान आहे. तर कमाल तापमान 28 ते 30 अंशाच्या दरम्यान आहे. कोकणातील तापमान काहीसे अधिक आहे. राज्यातील किमान तापमान पुढील काही दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.




