अहिल्यानगर (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलगा व मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना अहिल्यानगर शहरात घडल्या आहेत. या प्रकरणी पीडितांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बालिकाश्रम रस्ता परिसरात राहणार्या एका व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीकडे त्यांची जामखेड तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन भाची (वय 14) दिवाळी सुट्टीनिमित्त आली होती.
दरम्यान, बुधवारी (27 नोव्हेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी कंपनीमधून घरी आले असता घरामध्ये त्यांनी पत्नीकडे भाची विषयी चौकशी केली असता पत्नीने त्यांना ती बाहेर खेळत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मुलगी एका मुलाच्या दुचाकीवर बसून गेल्याचे समोर आले. तो मुलगा विकास गणपत भोरे (पत्ता नाही) याच्या सारखा दिसत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस मुलीचा शोध घेत आहे.
केडगाव उपनगरातील एका व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचा अल्पवयीन मुलाला (वय 16) अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. सदरची घटना मंगळवारी (26 नोव्हेंबर) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास घडली असून पीडित मुलाच्या वडिलांनी गुरूवारी (28 नोव्हेंबर) कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मुलाचा शोध घेत आहेत.