अहिल्यानगर (प्रतिनिधी)
नगर तालुक्यातील एका गावातील अंगणवाडी सेविकेवर अंगणवाडीतच अत्याचार करून त्यांचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांचा मृतदेह नदीच्या पाण्यात टाकला.
दरम्यान, अत्याचार करून खून करणारा संशयित सुभाष बंडू बर्डे (वय 25, रा. कुक्कडवेढे, ता. राहुरी. हल्ली, रा. चिचोंडी पाटील) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने हा सर्व प्रकार केल्याची कबूली पोलिसांसमोर दिली आहे.
नगर तालुक्यातील एका गावातील अंगणवाडीत सेविका कार्यरत होत्या. त्या गुरूवारी (24 ऑक्टोबर) सकाळी नेहमीप्रमाणे अंगणवाडीत गेल्या मात्र, दुपारी उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. परंतु, त्या कोठेही आढळून आल्या नाहीत. त्यानंतर नातेवाईक व काही ग्रामस्थांनी थेट अंगणवाडीत जावून पाहणी केली असता अंगणवाडीला बाहेरून कुलूप लावले असल्याचे दिसून आले.
नातेवाईक व ग्रामस्थांनी अंगणवाडीचे कुलूप तोडले असता अंगणवाडीच्या फरशीवर सर्वत्र सक्ताचा सडा पडलेला होता. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी परिसरात पाहणी केली असता घटनास्थळापासून काही अंतरावर काहीतरी ओढत नेल्याच्या खुणा दिसत होत्या.
वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या घटनेच्या गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे निर्देश अधीक्षक ओला यांनी दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आहेर यांना खबर्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक विश्लेशनानुसार हा गुन्हा सुभाष बर्डे याने केला असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या पथकाने बर्डे याला रात्रीतून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता अंगणवाडी सेविकेने बर्डे याला त्याच्या मुलीचे पोषण आहाराचे साहित्य घेण्यासाठी अंगणवाडीमध्ये बोलविले होते. त्यावेळेस अत्याचार व खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह अंगणवाडी शेजारील नदीचे पात्रात टाकून दिल्याची कबली दिली.
निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक थोरात, पोलीस अंमलदार बबन मखरे, फुरकान शेख, शरद बुधवंत, सोमनाथ झांबरे, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, अमोल कोतकर, चंद्रकात कुसळकर, विजय ठोंबरे, उदय घोडके, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने संशयित आरोपी सुभाष बर्डे याला अटक केली. त्याला पुढील तपासाकामी तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोषण आहार घेण्यासाठी आला होता अंगणवाडीत
सुभाष बर्डे याला त्याच्या मुलीच्या पोषण आहाराचे साहित्य घेण्यासाठी अंगणवाडी सेविका यांनी अंगणवाडीत बोलावले होते. तो दुपारच्या वेळी तेथे आला. त्यावेळी त्यांना एकटीला पाहून त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यास सेविकाने प्रतिकार केला असता झटापटीत बर्डे याने त्यांचे डोके भिंतीवर आपटवले. त्यामुळे त्या बेशुध्द पडून जागीच मयत झाल्या. दरम्यान, त्याने सेविकावर अत्याचार देखील केला असल्याची कबूली दिली आहे. सुरूवातीला अपहरणाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात अत्याचार व खूनाचे वाढीव कलम लावण्यात आले आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी दिली.