अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पावसाची बिकट परिस्थिती, पाण्याची कमतरता आणि गाळपासाठी उपलब्ध होणार्या उसाचे घटलेले क्षेत्र यामुळे ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नगरच्या साखर कारखानदारीसमोर यंदा मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत. आगामी गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होण्याचे नियोजन असले, तरी उसाची उपलब्धता लक्षात घेता हा हंगाम अवघ्या 100 दिवसांचा राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे कारखान्यांचे अपेक्षित गाळप घटून उत्पादन खर्चाचा भार वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील ऊस गाळपाचे नियोजन करण्यासाठी सोमवार, 5 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील साखर कारखान्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत उपलब्ध ऊस, कारखान्यांची गाळप क्षमता आणि हंगामाचे नियोजन याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. गेल्या हंगामात नगर जिल्ह्यात एक कोटी 15 लाख 69 हजार 376 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. मात्र, यंदा प्रतिकूल हवामान आणि पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कृषी विभाग, साखर कारखाने आणि साखर सहसंचालक कार्यालयाच्या संयुक्त आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एक लाख 69 हजार 728 हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. आता आगामी हंगामात प्रत्यक्ष किती ऊस उपलब्ध होतो आणि कारखान्यांचे गाळप किती दिवस चालते, याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.
कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडणार ?
गाळप हंगामाचा कालावधी कमी झाल्यास साखर कारखान्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारखान्यांची यंत्रसामग्री, दुरुस्ती, कर्मचारी व्यवस्थापन आणि अन्य आस्थापना खर्च यांसारखे खर्च तुलनेने कायम राहतात. मात्र, गाळपाचे प्रमाण घटल्यास प्रतिटन उत्पादन खर्च वाढू शकतो. परिणामी, कारखान्यांच्या आर्थिक अडचणी अधिक गंभीर होण्याची भीती आहे. याशिवाय, साखरेचे बाजारभाव, उत्पादन खर्च आणि उपलब्ध साठा यांचाही कारखान्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार आहे. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून आयातीसंबंधी कोणते निर्णय घेतले जातात, याकडेही उद्योगाचे लक्ष आहे.
कुकडी, पियुष, तनपुरे कारखान्यांबाबत उत्सुकता
जिल्ह्यात उसाची उपलब्धता कमी राहण्याची शक्यता असल्याने सर्वच कारखान्यांना पूर्ण क्षमतेने गाळप करणे आव्हानात्मक ठरू शकते. विशेषतः कुकडी, पियुष आणि तनपुरे साखर कारखाने यंदा सुरू होणार का, याबाबत उत्सुकता आहे. या कारखान्यांच्या सुरू होण्याबाबतची अधिकृत स्थिती आणि उपलब्ध उसाचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. एकीकडे शेतकर्यांना उसाचे उत्पादन टिकविण्याचे आव्हान, तर दुसरीकडे कारखान्यांना पुरेसा ऊस मिळविण्याची चिंता, अशी दुहेरी कोंडी यंदा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या नियोजन बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात आणि प्रत्यक्ष गाळप हंगामाचे चित्र कसे स्पष्ट होते, याकडे जिल्ह्यातील शेतकरी आणि साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.




