Thursday, January 29, 2026
HomeनगरAhilyanagar : नगर जिल्ह्यावर दादांची होती मजबूत पकड

Ahilyanagar : नगर जिल्ह्यावर दादांची होती मजबूत पकड

साहेबांच्या समर्थकांशी फारसे जमले नाही...

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर जिल्हा हा सहकाराचा बालेकिल्ला असून राज्यातील सहकारी संस्थांवर अजित पवार यांचे एका प्रकारे राजकीय वर्चस्व होते. यामुळे नगर जिल्ह्यावर अजितदादा यांची मजबूत पकड होती. जिल्ह्यातील मोठ्या पवार साहेबांच्या समर्थकांशी अजितदादा यांचे फारस जमले नाही. मात्र, अजितदादांचा शब्द देखील जिल्ह्यातील नेत्यांनी कधीच मोडला नाही. अजित पवार यांनी नगर जिल्ह्यात त्यांचा स्वतंत्र गट तयार केलेला होता.

- Advertisement -

नगर हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. 1999 मध्ये जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली, त्यावेळी थोरात, राजळे व अन्य काही नेते वगळता बहुतांशजण पवारांच्या समवेत राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर अजितदादा पवारांनीही नगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करताना समांतर राष्ट्रवादी चालवली. राजकारणातील नव्या नेतृत्वाला, तरुणांना आपलेसे करीत त्यांना ताकद दिली. मोठ्या साहेबांचे सहकारी असलेल्या मधुकरराव पिचड, यशवंतराव गडाख, दादा कळमकर, शंकरराव कोल्हे, दादा पाटील शेळके, बबनराव पाचपुते, रावसाहेब म्हस्के, अरुण पाटील कडू, भानुदास मुरकुटे यांच्याशी अजितदादांचे फारसे सख्य नव्हते. फक्त पारनेरचे वसंतराव झावरे यांच्याशी त्यांचे पटायचे. पण मोठ्या साहेबांना मानणार्‍यांशी त्यांचे राजकीय मतभेद नव्हते.

YouTube video player

मात्र, त्यांचे राजकीय सल्ले घेतले तरी जिल्ह्यातील राजीव राजळे, चंद्रशेखर घुले, सिद्धार्थ मुरकुटे, सुजित झावरे, आशुतोष काळे, संग्राम जगताप, डॉ. किरण लहामटे, निलेश लंके, राहुल जगताप, वैभव पिचड, घनःश्याम शेलार अशा युवा नेत्यांना अजितदादांनी ताकद दिली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर या तरुण नेत्यांपैकी बहुतांशजणांनी अजितदादांना साथ दिली. शरद पवारांसारखाच स्वतंत्र जम अजितदादांनी नगर जिल्ह्यात बसवला होता.

जिल्हा बँकेसह अन्य निर्णय दादांच्या कोर्टात
नगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने जिल्ह्यातील बड्या सहकारी संस्थासोबतच जिल्हा बँकेच्या राजकारणात आणि निर्णय प्रक्रियेत अजित पवार यांना विचारल्याशिवाय फायनल होत नसे. मग जिल्हा बँकेचे अध्यक्षपद पद असो की अथवा जिल्हा बँकेच्या भरती अथवा विविध योजना या ठिकाणी अजितदादांचा शब्द हा प्रमाण मानला जात. राज्य बँकेवर राष्ट्रवादीचे पर्यायाने अजित पवार यांचे वर्चस्व होते. यासह जिल्ह्यातील साखर कारखानदारी व अडचणीविषय सर्वप्रथम अजित पवार यांच्या समोर गेल्यानंतर त्यावर ते निर्णय घेत असे. जिल्हा बँकेच्या अलिकडच्या काही महिन्यांपूर्वीच्या चेअरमन पदाचा निर्णय अजितदादांनी घेत त्या ठिकाणी चंद्रशेखर घुले यांना संधी दिली.

अन् सामान्य प्रशांत गायकवाड निवडून आले
गेल्या पाच वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघातून पारनेर तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्या असणार्‍या प्रशांत सबाजी गायकवाड यांना जिल्हा बँकेची उमेदवारीच दिली नाही, तर जिल्ह्यातील प्रस्तापित नेत्यांना बाजूला करून अजितदादा यांनी प्रशांत गायकवाड यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निवडून आणत दिलेला शब्द पूर्ण केला. यासाठी अजितदादांनी यांनी आपली पूर्ण ताकद प्रशांत गायकवाड यांच्या पाठीमागे उभी केली होती. अशा प्रकारे नगर जिल्ह्यात अजित पवार यांनी अनेक सामान्यांना पाठबळ देत त्यांचे राजकीय बस्तान बसवले. नगर जिल्हा परिषदेत राजेंद्र गुंड यांच्या पत्नी मंजूषाताई गुंड यांना देखील अजित पवार यांच्यामुळे अध्यक्षपदावर संधी मिळाली. जिल्ह्यातील अनेक लाडक्या कार्यकर्त्यांनी अजितदादाच्या सहनभूतीचा वापर करत आपले उखळ पांढरे केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

ताज्या बातम्या

Sangamner : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर वादग्रस्त पोस्ट

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि.28) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. यामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा...