Wednesday, August 19, 2026
HomeनगरAhilyanagar : शेतीपूरक तसेच बिगर शेती मतदारसंघातील मतदार घटले

Ahilyanagar : शेतीपूरक तसेच बिगर शेती मतदारसंघातील मतदार घटले

बंद पडलेल्या, अवसायानात निघालेल्या, नोंदणी रद्द झालेल्या संस्थांना वगळले || गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा 2730 मतदार होणार कमी

अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांच्या मान्यतेने आज बुधवार (दि.19) रोजी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी बँकेने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवलेल्या 5 हजार 890 मतदार (सभासदांच्या) यादीपैकी 4 हजार 13 मतदारांचे ठराव बँकेला निवडणूक निर्णय अधिकारी यांना उपलब्ध करून देता आले. तसेच उपलब्ध झालेल्या ठरावांपैकी 366 ठराव हे अपात्र ठरल्याने, व्यक्तीगत मतदार, तसेच शेती पूरक आणि बिगर शेती मतदारसंघा एकूण 3 हजार 677 मतदार हे प्रारूप मतदार यादीत पात्र ठरले आहेत.

- Advertisement -

यंदाच्या बँकेच्या मतदार यादीत शेतीपूरक व बिगर शेती मतदारसंघातील 2 हजार 730 मतदारांची नावे घटली असून घटलेल्या मतदारांचा फटका कोणाला बसणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँक निवडणुकीची प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून सेवा सोसायटी मतदारसंघातून ठराव घेवून ते जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठवण्यासाठी 16 जुलैपर्यंत मुदत होती. तालुका पातळीवर बँकेचा ठराव आपल्या बाजूने घेता यावा, या साठी अनेक ठिकाणी नाट्यपूर्ण घडामोडी घडत मतदारांची पळवापळवी झाली. यातील बहुतांशी ठिकाणी पोलिस बंदोबस्तात ही प्रक्रिया पारपडण्यात आली. दरम्यान, सुरूवातीपासून जिल्हा बँकेच्या मतदार यादीत अनेक ठिकाणी बंद असणार्या संस्थांची नावे असल्याचा आरोप सुरू होता. यामुळे जिल्हा बँकेच्यावतीने तालुकानिहाय पाठवलेल्या सभासदांची यादी गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक नाशिक यांच्या कार्यालयात तपासण्यात आली.

यात बँकेचे सभासद असलेल्या अनेक संस्था अवसायनात निघालेल्या असतांना, त्यातील काही बंद पडलेल्या असतांना, काहींची नोंदणी रद्द झालेली असतांना, तर काही बंद पडलेल्या पतसंस्थांचे विलीनीकरण करण्यात आलेले असतांना त्यांची नावे मतदारांच्या यादीत होती. तसेच बँकेच्यावतीने यादी तयार करतांना बँकेने 1 जून 2023 या अर्हता तारखेनुसार निवडणुकीसाठी सभासदांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच शेअरची रक्कम पाच हजार रुपये भरलेल्या सभासदांना मतदानासाठी पात्र ठरवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते. अशा 5 हजार 890 मतदारांची यादी बँकेच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आली होती. ही यादी गेल्या काही दिवसांपासून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पातळीवर तपासण्यात आलेली. या यादीतील 4 हजार 13 सभासदांचे ठराव उपलब्ध झाले. तसेच 366 ठराव हे अपात्र करण्यात आले.

बँकेसाठी विकास सेवा संस्थांची 1 हजार 414 पैकी 1 हजार 367 ठराव, 2 हजार 337 पैकी 1 हजार 595 बिगर शेती संस्था, तर शेतीपूरक 2 हजार 139 संस्थांपैकी 1 हजार 51 ठराव, तर 243 व्यक्तीगतपैकी केवळ 33 ठराव प्राप्त झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीत गत पंचवार्षिकच्या तुलनेत 2 हजार 730 मतदार संख्या घटली असून घटलेली मतदार संख्या कोणासाठी डोकेदुखी ठरणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

यंदाची निवडणूक जोरदार गाजण्याची चिन्हे

अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा बँकेची प्रारूप मतदार यादी जाहीर होताच तालुक्या-तालुक्यांत राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. जिल्हा बँक निवडणुकीचा इतिहास पाहता, आतापर्यंत पक्षीय राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत ही निवडणूक लढल्याचे दिसून आले आहे. मात्र, गेल्या महिनाभरात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर प्रमुख नेत्यांच्या राजकीय भेटीगाठी व हालचाली वाढल्याने यंदाची निवडणूक जोरदार गाजण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतून 6380 क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू

0
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेले भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून रतनवाडी आणि घाटघरमध्ये श्रावणसरींचा जोर वाढल्याने निळवंडे धरणातून 6380 क्युसेकने...