Friday, November 6, 2026
HomeनगरAhilyanagar : दिवाळी होताच चेअरमनपदाचा बार

Ahilyanagar : दिवाळी होताच चेअरमनपदाचा बार

जिल्हा बँकेच्या नूतन चेअरमन, व्हा. चेअरमनपदाच्या निवडीकडे लक्ष

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा मंगळवार (दि. 3) रोजी निकाल जाहीर झाला असून, बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी येत्या 12 नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात येणार आहे. जिल्हा बँकेच्यावतीने या विशेष सभेच्या अधिसूचनेचे नियोजन करण्यात आले आहे. या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे राहणार आहेत.

- Advertisement -

जिल्हा सहकारी बँकेवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडाख यांच्या सहकार विकास पॅनलने सत्ता मिळविली आहे. आता सहकार विकास पॅनलकडून बँकेचा भावी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निकालानंतर अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरू झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेदरम्यानच अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा उमेदवार आणि बँकेचे नवे कारभारी निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी अधिसूचना काढण्यात येणार आहे. या अधिसूचनेनुसार संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात येईल. या सभेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी एकमत न झाल्यास मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्हा बँकेच्या निकालानंतर आता पुढील अध्यक्ष कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अध्यक्षपदासाठी विखे गटाकडून कोणाचे नाव पुढे येणार? थोरात गटाला उपाध्यक्षपद मिळणार का? की विखे आणि थोरात गटाला मान्य असलेल्या एखाद्या नावावर एकमत होणार? तसेच बँकेच्या अध्यक्षपदी महिलेला संधी मिळणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पाडव्याला पुन्हा खलबते
दोन दिवसावर दिवाळी आणि लक्ष्मीपूजन आलेले आहे. रविवारनंतर सोमवार रिकामा असून त्यानंतर मंगळवारी पाडवा आहे. या पाडव्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील नेते एकत्र येवून बँकेत सहकार विकासचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या उमदेवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आहेत. दरम्यान, यंदा जिल्हा बँकेत सहा महिला संचालक असून यातून अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर कोणाला संधी मिळणार का? याकडे सर्वाचे लक्ष राहणार आहे.

1967 ते 2021 या कालावधीत जिल्हा बँकेत 39 नेत्यांना चेअरमन होण्याची संधी मिळालेली आहे. तर गत पाच वर्षात तीन चेअरमन आणि एक प्रशासक अशा प्रकारे 42 नेते आणि सहकार खात्याच्या एका महिला अधिकारी यांना जिल्हा बँकेवर अध्यक्ष अथवा प्रशासक म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे. आता बँकेचा 44 प्रशासक कोण याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटेना

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सन 2026-27 च्या गळीत हंगामातील प्रतिटन ऊस दर अद्याप जाहीर झालेला नसल्याने शेतकर्‍यांमधील अस्वस्थता वाढली आहे. ऊस दर निश्चित...