अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सहकार संस्था निवडणूक नियम 2014 च्या 10 मधील पोटनियम 4 मधील तरतूदीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पाच दिवस आधी नव्याने ठराव करण्याची संधी आहे. त्यामुळे आता अंतिम मतदार यादी झाली तरी प्रतिनिधीचे ठराव बदलले जावू शकतात. दहा वर्षाच्या कार्यकाळानंतरही निवडणूक लढण्याची मुभा राज्य शासनाने दिली आहे, पण ठराव नसल्याने रिंगणातून बाहेर पडलेल्यांना आता या पोटनियमाच्या आधारे रिंगणात उतरण्याची संधी मिळाली आहे. याचा फायदा नगर जिल्ह्यातून कोण कोण घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सदस्य संस्थांचे प्रतिनिधीचे ठराव मागविण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी काढतांना सहकारी संस्था निवडणूक नियमावली देण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 17 जून ते 16 जुलैपर्यंत सदस्य संस्थांचे प्रतिनिधींचे ठराव देण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात सहकारी संस्थांनी निवडणूक अधिकार्याकडे ठराव पाठविले. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी 19 ऑगस्टला निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. 31 ऑगस्टपर्यंत हरकती व सुचना करण्याची मुदत देण्यात आली आहे.
अंतिम मतदार यादी 15 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर बँकेच्या 21 संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. दरम्यान, निवडणुकीसाठी बँकेचे 3 हजार 647 संस्था प्रतिनिधीचे ठराव आले आहेत. त्यात 366 संस्थेचे ठराव अपात्र ठरले असून 233 संस्थांनी ठराव सादर केले नाही. आता 31 ऑगस्टपर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्याची मुदत दिली असतांनाच राज्य शासनाने 22 ऑगस्ट रोजी विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानंतर दहा वर्षांच्या कार्यकाळानंतर निवडणूक लढण्याची बंदी उठविली. तसेच पत्र देखील शासनाने सहकार निवडणूक प्राधिकरणास दिले. सहकारी बँकेच्या संचालकांना 10 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला म्हणून निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवू नये.त्यामुळे आता संचालकांना दिलास मिळाला आहे. मात्र या दहा वर्षाच्या निर्बंधामुळे संचालकांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.
मात्र दहा वर्षानंतरही निवडणूक लढता येणार असल्याचा मार्ग मोकळा झाल्याने संचालकांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. त्यात आता सहकार संस्था निवडणूक नियमाचाही आधार मिळणार आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम 2014 च्या नियम 10 मधील पोटनियम 4 मधील तरतूदीनुसार सभासद संस्थेने एकदा पाठविलेला प्रतिनिधीचा ठराव जर संस्थेचे संचालक मंडळ निवडणुकीद्वारे बदलले असेल किंवा प्रतिनिधींचा मृत्यू झाला असेल किंवा प्रतिनिधीने राजीनामा दिला असेल किंवा अधिनियमाच्या, नियमाच्या, उपविधीच्या कोणत्याही तरतूदी अन्वये सक्षम प्राधिकरणाच्या अभिनिर्णयानुसार असा प्रतिनिधी अपात्र असल्याचे आढळून आले असेल अशा चार कारणांसाठी नव्याने ठराव घेवून प्रतिनिधी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या निश्चित केलेल्या अंतिम दिनांकाच्या पाच दिवस पूर्वीपर्यंत बदलला येऊ शेल अन्यथा बदल करता येणार नाही. या पोटनियमामुळे आता संचालकांना पुन्हा ठराव करण्याची संधी देखील मिळाली आहे. त्यामुळे आता या पोटनियमाच्या माध्यमातून संचालक पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार का याबाबत उत्सुकता आहे.




