अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या दुसर्या दिवशी तब्बल 170 अर्जांची विक्री झाली. त्यामुळे पहिल्या दिवशी 361 असलेली अर्ज विक्रीची संख्या दुसर्या दिवशी 531 वर पोहोचली. दरम्यान, राहुरी तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून आमदार प्राजक्त तनपुरे, महिला राखीव मतदारसंघातून जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा गुंड, तर बिगरशेती मतदारसंघातून धनलक्ष्मी हजारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राजकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची वाढती गर्दी पाहता बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांसमोर आव्हान निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी अनेक इच्छुकांनी एकाचवेळी अनेक उमेदवारी अर्ज खरेदी केल्याचेही दिसून आले. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्ज विक्रीची निर्धारित वेळ संपल्यानंतर दुपारी तीन वाजल्यानंतरही काही इच्छुकांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे अर्ज मिळविण्यासाठी आग्रह धरला. जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांसाठी ही निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज खरेदी आणि दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मतदार यादीत नाव असणे ही अर्ज खरेदीसाठी आवश्यक अट असल्याने यादीत नाव नसलेल्या व्यक्तींना या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
बँकेच्या शाखेत निवडणूक प्रक्रिया
जिल्हा बँकेच्या 21 संचालकांच्या निवडणुकीसाठी नगर येथील बँकेच्या चाहूराणा शाखेत निवडणूक निर्णय अधिकार्यांचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देवीदास खेडकर आणि देवीदास घोडेचोर निवडणुकीची प्रक्रिया सांभाळत आहेत. सहकार विभागाने यासाठी स्वतंत्र कर्मचारी पथक नियुक्त केले असून, उमेदवारी अर्जांची विक्री आणि अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस!
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आता अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवारी आणि गुरुवारी अर्ज खरेदी व दाखल करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर शुक्रवार ते रविवार सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी थेट 5 तारखेच्या अखेरच्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत अर्ज खरेदी आणि उमेदवारी दाखल करण्याच्या प्रक्रियेला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
दिग्गजांकडून अर्जांची खरेदी
मंगळवारी माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील, बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, माजी उपाध्यक्ष रामदास वाघ, संचालक प्रशांत गायकवाड, गीतांजली शेळके, पांडुरंग सोले पाटील, घनश्याम शेलार, प्रमोद राहणे (विखे यांच्यासाठी), जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, पारनेरमधील वैभव लंके, विजयलक्ष्मी फाळके यांच्यासह अन्य इच्छुकांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची माहिती निवडणूक सूत्रांनी दिली. दरम्यान, दुसर्या दिवशी तीन उमेदवारांनी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये राहुरी तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपचे आमदार प्राजक्त तनपुरे, महिला राखीव मतदारसंघातून जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा गुंड आणि बिगरशेती मतदारसंघातून धनलक्ष्मी हजारेंचा समावेश आहे.




