अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूूक बिनविरोधचा फुसका बार फुसका ठरला. मोठा आटापिटा केल्यानंतर कशाबशा 9 जागा बिनविरोध झाल्या असून 12 जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, माघारीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय व परिसारात नेते आणि समर्थकांची माघारीसाठी एकच धावपळ दिसून आली. यावेळी टेन्शन, गोंधळ, एकमेकांची विनवणी करत माघारीसाठी मनधरणीचे चित्र होते.
दरम्यान, माघारीनंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आठ जागांवर राष्ट्रवादीचे खा. नीलेश लंके आणि विखे-थोरात गटात लढत दिसत आहे. तर चार जागावर सभापती राम शिंदे यांनी स्वतंत्र उमेदवार जाहीर केेलेले असून या उमेदवारांविरोधात विखे-थोरात गटाच्यावतीने उमेदवार जाहीर करून चिन्ह मिळवल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सभापती शिंदे यांच्या गोटातून सांगण्यात आले. यामुळे आता माघारीनंतरच चिन्ह वाटप झाल्यावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी काही मतदारसंघातील चित्र ठळकपणे स्पष्ट होणार आहे.
बुधवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी तालुका सोसायटी मतदारसंघातून आ. मोनिका राजळे (पाथर्डी), आ. अक्षय कर्डिले, माजी खासदार डॉ. सुजय विखे (राहाता), जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले (शेवगाव), संजीवनी उद्योग समृहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे (कोपरगाव), श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे (श्रीरामपूर) यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज माघारीने या नेत्यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. तर यापूर्वीच माजी मंत्री शंकरराव गडाख (नेवासा), दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख (संगमनेर) तर बिगर शेती मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप व या नऊ जागा बिनविरोध झाल्या आहेत. सोसायटी मतदारसंघातील सात तर राखीव मतदारसंघात दोन अशा नऊ जागा बिनविरोध करण्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजीमंत्री बाळासाहेब थोरात या सहमती एक्सप्रेसला यांना यश आले आहे.
उर्वरित 12 जागांसाठी आता निवडणूक होत आहे. त्यात सोसायटी मतदारसंघातील अकोले, श्रीगोंदा, पारनेर, नगर, राहुरी, कर्जत व जामखेड या सात जागांसह महिला राखीवच्या दोन, अनुसूचित जाती-जमातीची एक, इतर मागसवर्गीयची एक, वि.जा.भ.जची एक या राखीवच्या पाच अशा 12 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आता तीन लंगडे मंडळ उभे असल्याचे प्राथमिक चित्र आहे. त्यात विखे- थोरात यांची सहमती एक्सप्रेस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र मंडळ या बँकेच्या निवडणूक रिंगणात दिसत आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. मात्र विधान परिषदेचे सभापती शिंदे यांनी दुपारी एक वाजता अचानक चार जागांसाठी उमेदवार जाहीर केले. त्यात कर्जतमधून ज्योती प्रकाश शिंदे, जामखेडमधून सचिन घुमरे, महिला राखीवच्या एका जागेसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मंजुषा गुंड व मागासवर्गीय मतदारांघासाठी आजिनाथ हजारे यांची नावे जाहीर केल्यानंतर निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. आता या चार जागांमध्ये सभापती शिंदे विरुद्ध विखे- थोरात सहमती एक्सप्रेस अशी लढत होणार आहे. तर अकोले, श्रीगोंदा, पारनेर, नगर, श्रीगोंदा या सोसायटीच्या चार जागांसह महिला राखीवची एक जागा, अनुसूचित जाती-जमातीची एक, इतर मागसवर्गीयची एक, वि.जा.भ.जची एक या राखीवच्या चार अशा आठ जागांवर खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील मंडळ व विखे- थोरात सहमती एक्सप्रेस अशी लढत होणार आहे.
तसेच महिला राखीव एक जागा व मागसवर्गीय एक अशा दोन जागांसाठी मात्र विखे- थोरात सहमती एक्सप्रेस, खा. लंके शक्य झाल्यास शिंदे अशा तिन मंडळ एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारीसाठी काल दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत होती. या मुदतीमध्ये जास्तीत-जास्त उमेदवारांची माघारी होण्यासाठी विखे पितापुत्रांकडून जोरादार फिल्डींग लावण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने उमेदवारी माघारीसाठी उमेदवारांसह सुचक, अनुमोदक व समर्थकांची एकच गर्दी निवडणूक कार्यालयात झाली होती. सोमवारपर्यंत अवघ्या 22 जणांनी माघार घेतली होती. त्यामुळे 217 उमेदवारांचे अर्ज राहिले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची माघार घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र विखे पिता-पुत्रांसह थोरात व आमदार संग्राम जगताप यांनी शर्तीचे प्रयत्न करीत मोठ्या प्रमाणावर उमेदवारांचे माघार घेण्यास यश मिळविले.
घुले, गायकर, पिसाळांची माघार
लातूर पॅटनमुळे धास्तावलेल्या बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, सीताराम गायकर व माजी संचालक अंबादास पिसाळ यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. घुले यांनी पत्नी राजश्री घुले यांचा अर्ज ठेवून स्वतः माघारी घेतल्याने राजश्री घुले बिनविरोध झाल्या. तर अकोलेमध्ये गायकर यांनी माघार घेऊन मुलगी संजीवनी शिंदे यांचा अर्ज ठेवला आहे. तसेच कर्जतमधून पिसाळ यांनी माघार घेऊन चिरंजीव तुषार पिसाळ यांचा अर्ज ठेवला आहे.
गत पंचवार्षिकपेक्षा यंदा टफफाईट
जिल्हा बँकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विखे विरोधात नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी पॅनल करत निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत 21 पैकी 17 जागा बिनविरोध निघाल्या होत्या. तर नगर, कर्जत, पारनेर आणि बिगरशेतीच्या जागेसाठी लढत झाली होती. यात बिगरशेतीच्या जागेवर प्रशांत गायकवाड यांनी मोठी चुरस निर्माण केली होती. यंदा अकोले, पारनेर, श्रीगोंदा, राहुरी, कर्जत आणि जामखेडसह जनरलच्या सहा जागांवर टफफाईट होणार आहे. विशेष करून महिला राखीच्या जागांवर सर्वात तगडी लढत होणार आहे.
आज सकाळी चिन्ह वाटप
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज गुरूवार (सकाळी) 11 वाजता चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी समान चिन्हे मिळणार्या उमदेवारांचे पॅनल तयार होणार आहे. तर विरोधी चिन्हे असणारी मंडळी एकमेकांविरोधात सरळ लढत देणार आहे. विखे-थोरात गटाच्यावतीने आ. आशुतोष काळे यांनी चिन्हासाठी अर्ज केलेला आहे. त्यावर सकाळी निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.




