अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर जिल्ह्यातच नव्हे, तर आशिया खंडातील सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज, सोमवार (दि. 28) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. इच्छुक उमेदवारांना 5 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. जिल्हा बँकेच्या 21 मतदारसंघांसाठी नगर येथील बँकेच्या चांदणी चौक शाखेत निवडणूक निर्णय अधिकार्यांचे कार्यालय राहणार असून, याच ठिकाणी उमेदवारी अर्जांची विक्री आणि स्वीकृती केली जाणार आहे.
जिल्हा बँकेच्या 21 संचालकपदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, 2 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर असा सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. 6 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर 7 ते 21 ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार प्रत्येक टप्प्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून, उमेदवारी अर्जांची विक्री व स्वीकृतीसाठीही नियोजन करण्यात आले आहे. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक व्यवस्था पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी दिली.
अवघी दोन हजारांची अनामत रक्कम!
जिल्हा बँकेची निवडणूक म्हटले की कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची चर्चा सहकार क्षेत्रात नेहमीच होते. जिल्हा परिषद किंवा विधानसभा निवडणुकीपेक्षा जिल्हा बँकेची निवडणूक आर्थिकदृष्ट्या अधिक खर्चिक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असते. संचालकपद हे प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक रस्सीखेच होत असल्याचे चित्र यापूर्वीही पाहायला मिळाले आहे. मात्र, एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीची चर्चा असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराला भरावी लागणारी अनामत रक्कम मात्र अवघी 2 हजार रुपये आहे.
अर्जाची किंमत 100 रुपये
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची किंमत प्रत्येक मतदारसंघासाठी 100 रुपये निश्चित करण्यात आली आहे. इच्छुकांना संबंधित मतदारसंघाचा सशुल्क अर्ज घेऊन तो आवश्यक कागदपत्रांसह भरावा लागणार आहे. भरलेले अर्ज नगर येथील बँकेच्या मार्केट यार्ड येथील चालूराना शाखेत असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवडणूक कार्यालयात जमा करावे लागणार आहेत.
या मतदारसंघासाठी निवडणूक
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सेवा सोसायटी मतदारसंघातील जिल्ह्यातील 14 तालुक्यांचे 14 मतदारसंघ आहेत. याशिवाय बिगरशेती संस्था, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि महिला राखीव मतदारसंघांचा समावेश आहे. अशा एकूण 21 मतदारसंघांतून संचालक मंडळाची निवड केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा टप्पा सुरू होत असल्याने इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना आता वेग येणार आहे. विविध राजकीय गटांकडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू असून, काही मतदारसंघांत बिनविरोध निवडीसाठीही हालचाली सुरू आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे.




