अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या हालचालींना वेग आला असतानाच विधान परिषदेचे सभापती तथा भाजपचे नेते राम शिंदे यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या भेटीचा मुहूर्त साधला आहे. आज मंगळवारी सकाळी नेवासा तालुक्यातील सोनई येथील गडाख यांच्या आमराईतील निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, शिंदे यांच्या भेटीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचाही नगर दौरा असून यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांचे ‘मनोमिलन’ घडणार की राजकीय ‘सीमोल्लंघन’ करीत संघर्षाची वाट धरली जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीने आता निर्णायक वळण घेतले आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना यश मिळणार की निवडणुकीतील संघर्ष अटळ ठरणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दसर्याचे औचित्य साधत शिंदे यांनी गडाख यांच्याशी पुन्हा संवाद साधण्याचे ठरविले आहे. या भेटीचा अधिकृत दौरा सोमवारी जाहीर करण्यात आला. यापूर्वीही शिंदे यांनी नगर येथील निवासस्थानी गडाख यांची भेट घेऊन जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर शिंदे यांनी स्वतःची उमेदवारी मागे घेतली.
आता माघारीच्या अखेरच्या टप्प्यात ते पुन्हा गडाखांच्या भेटीला जात असल्याने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये बोलताना शिंदे यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गडाख यांनी वडिलकीच्या नात्याने पुढाकार घ्यावा, असे जाहीर आवाहन केले होते. मात्र, बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न सुरू असताना त्यात नेमका अडथळा कोण आणत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे गडाख या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात, तसेच त्यांच्या मध्यस्थीतून विविध राजकीय गटांमध्ये एकमत घडते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सोनईतील भेटीनंतर शिंदे पाथर्डी तालुक्यातील कार्यक्रम आटोपून नगरमध्ये येणार आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही दुपारनंतर नगरमध्ये येणार असून, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचाही दौरा नियोजित आहे. या नेत्यांच्या एकाच दिवशी होणार्या दौर्यांमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी नेत्यांमध्ये सहमती घडविण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी सर्वसाधारण मतदारसंघातील सात जागांचा तिढा अद्याप महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी तडजोडीचे सूत्र निघणार की उमेदवार माघार न घेता निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार, याचा फैसला बुधवारी होईल.
नगर सोसायटीच्या जागेवर आज खलबते
नगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नगर सोसायटी मतदारसंघाबाबत आज मंगळवारी सकाळी नगरमध्ये बैठक होणार आहे. या मतदारसंघातून जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके आणि माजी सभापती बाळासाहेब हराळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या जागेवर आमदार अक्षय कर्डिले यांची उमेदवारी असल्याने त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून नेमके कोण मैदानात उतरणार, याबाबत उत्सुकता आहे.




