Tuesday, September 22, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा बँक बिनविरोधसाठी सहमतीच्या राजकारणाची हाक

Ahilyanagar : जिल्हा बँक बिनविरोधसाठी सहमतीच्या राजकारणाची हाक

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन

अहिल्यानगर, सोनई |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक भागांत पिके डोळ्यादेखत करपत असून काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन राजकीय जोडे बाजूला ठेवून जिल्हा सहकारी बँकेची होत असलेली निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील नेत्यांकडून आता सहमतीच्या राजकारणाची हाक देण्यात येत असून त्याला कोण-कोण प्रतिसाद देणार याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष राहणार आहे. जिल्हा सहकारी बँक ही जिल्ह्याची कामधेनू असून जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या, महिला बचत गट तसेच शेतकरी सभासदांना बँकेच्या माध्यमातून पतपुरवठा केला जातो.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर जिल्हा बँकेशी जोडलेले आहे. अशा परिस्थितीत बँकेची निवडणूक प्रक्रिया राबविताना होणारा अनाठायी खर्च टाळणे आणि बँकेच्या आर्थिक हिताचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे मत गडाख यांनी व्यक्त केले आहे. बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सातत्याने मदत करण्याची भूमिका घेतली आहे. 1991 ते 2021 या कालावधीत तब्बल 31 वर्षे बँकेचे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तसेच 1993 ते 1995 आणि 1999 ते 2005 या कालावधीत सात वर्षे बँकेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली.

त्यामुळे जिल्हा बँकेच्या कामकाजाचा आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा जवळून अभ्यास असल्याचे गडाख यांनी म्हटले आहे. सध्या जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. अशा वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी राजकीय मतभेद आणि पक्षीय भूमिका बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्यक असल्याची भूमिका ज्येष्ठ नेते गडाख यांनी मांडली आहे.

प्रचारात गुंतण्याऐवजी शेतकर्‍यांसाठी वेळ देता येईल
जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी होणारा मोठा खर्च वाचविण्याबरोबरच बँकेचे संभाव्य नुकसान टाळता येईल. तसेच नेतेमंडळींना निवडणूक प्रचारात गुंतण्याऐवजी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकरी, नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळ देता येईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून राजकीय जोडे बाजूला ठेवत जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन गडाख पाटील यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेचा लवकरच निवडणूक कार्यक्रम

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादीचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष...