अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गेल्या चार महिन्यांपासून प्रशासक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी मंगळवार (दि.18) निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली असून येत्या 31 ऑगस्टपर्यंत हरकती व सुचना करण्याची मुदत देण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी 15 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार असून त्यानंतर बँकेच्या 21 संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. दरम्यान, यंदा निवडणुकीसाठी बँकेचे 3 हजार 677 मतदार आहेत. त्यात 366 संस्थेचे ठराव अपात्र ठरले असून 233 संस्थांनी ठराव सादर केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकांची मुदत 20 फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. मात्र, मे महिन्यात बँकेवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर जून महिन्यात विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था (शेती पुरक मतदारसंघ) व बिगर शेती संस्था मतदारसंघा अशा संस्थाचे 16 जुन ते 16 जुलैपर्यंत ठराव मागविण्यात आले होते. त्यानुसार निवडणूक अधिकारी निकम यांच्याकडे जिल्हा बँकेने 5 हजार 890 सभासदांची (मतदारांची यादी) पाठवली होती. यातून ठराव उपलब्ध झालेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थांचे 1 हजार 367, बिगर शेती मतदारसंघातून 1 हजार 595 तर शेती पुरक मतदारसंघातून 1 हजार 51 असे 4 हजार 13 संस्थांचे ठराव निवडणूक निर्णय अधिकारी निकम यांच्या उपलब्ध करून देण्यात आले होते. यातून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या यंत्रणेने तपासून 366 ठराव अपात्र केले. त्यात विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थांचे 7, बिगर शेती मतदारसंघाचे 124 तर शेती पुरक मतदारसंघाचे 235 यांचा सामवेश आहे.
तर 233 संस्थांनी ठराव दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थांचे 27, बिगर शेती मतदारसंघाचे 156 तर शेती पुरक मतदारसंघाचे 50 संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीसाठी आता सेवा सोसायटी मतदारसंघ, बिगरशेती मतदारसंघ आणि शेती पूरक मतदारसंघातून 3 हजार 647 आणि 30 व्यक्तीगत असे 3 हजार 677 मतदार निश्चित झाले आहेत. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता बुधवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यावर हरकती व सुचना करण्यासाठी 31 ऑगस्ट मुदत देण्यात आली आहेत.
31 ऑगस्टपर्यंत हरकती व सुचना
प्रारूप मतदार यादी ही जिल्हा बँकेच्या मुख्यालयासह बँकेच्या तालुका विकास अधिकारी कार्यालयात, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व तालुकास्तरावर सहनिबंधक कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 19 ऑगस्ट सकाळी 11 वाजल्यापासून ते 31 ऑगस्ट पर्यंत यादीवर हरकती व सुचना मागविण्यात आल्या आहेत. या हरकती व सुचनावर 10 सप्टेंबर रोजी निर्णय देण्यात येणार आहे. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर लगेच बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर तालुका
सोसायटी मतदारसंघ- 109, बिगर शेती 253, शेतीपूरक मतदारसंघ 33.
संगमनेर तालुका
सोसायटी मतदारसंघ- 135, बिगर शेती 279, शेतीपूरक मतदारसंघ 318.
कोपरगाव तालुका
सोसायटी मतदारसंघ- 109, बिगर शेती 230, शेतीपूरक मतदारसंघ 194.
राहाता तालुका
सोसायटी मतदारसंघ- 71, बिगर शेती 115, शेतीपूरक मतदारसंघ 100.
श्रीरामपूर तालुका
सोसायटी मतदारसंघ- 69, बिगर शेती 71, शेतीपूरक मतदारसंघ 11.
नेवासा तालुका
सोसायटी मतदारसंघ- 131, बिगर शेती 91, शेतीपूरक मतदारसंघ 33.
राहुरी तालुका
सोसायटी मतदारसंघ- 107, बिगर शेती 117, शेतीपूरक मतदारसंघ 42.
शेवगाव तालुका
सोसायटी मतदारसंघ- 69, बिगर शेती 23, शेतीपूरक मतदारसंघ 31.
पाथर्डी तालुका
सोसायटी मतदारसंघ- 84, बिगर शेती 33, शेतीपूरक मतदारसंघ 16.
जामखेड तालुका
सोसायटी मतदारसंघ- 47, बिगर शेती 54, शेतीपूरक मतदारसंघ 18.
कर्जत तालुका
सोसायटी मतदारसंघ- 75, बिगर शेती 68, शेतीपूरक मतदारसंघ 65.
श्रीगोंदा तालुका
सोसायटी मतदारसंघ- 171, बिगर शेती 104, शेतीपूरक मतदारसंघ 57.
पारनेर तालुका
सोसायटी मतदारसंघ- 104, बिगर शेती 86, शेतीपूरक मतदारसंघ 42.
अकोले तालुका
सोसायटी मतदारसंघ- 86, बिगर शेती 71, शेतीपूरक मतदारसंघ 91.
एकूण ठराव प्राप्त
सोसायटी मतदारसंघ- 1 हजार 367, बिगर शेती 1 हजार 595, शेतीपूरक मतदारसंघ 1 हजार 51.




