Friday, August 21, 2026
HomeनगरAhilyanagar : आजी-माजी लोकप्रतिनिधींना जिल्हा बँकेत पुन्हा संधी!

Ahilyanagar : आजी-माजी लोकप्रतिनिधींना जिल्हा बँकेत पुन्हा संधी!

निवडणुकीसाठीच्या ठरावात ज्येष्ठ नेत्यांसह नव्या चेहर्‍यांचा समावेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महाराष्ट्रासह संपूर्ण आशिया खंडात नावलौकिक असलेल्या, तसेच नगर जिल्ह्यातील शेतकरी आणि साखर कारखानदारांची आर्थिक कामधेनू मानल्या जाणार्‍या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीत विद्यमान खासदार-आमदारांसह माजी आमदार, जिल्हा बँकेचे माजी संचालक आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. तसेच वेगवेगळ्या मतदारसंघांतून ठरावांच्या माध्यमातून अनेक नव्या चेहर्‍यांनाही संधी मिळाली आहे.

- Advertisement -

सहकार क्षेत्रातील बदलेल्या नियमांमुळे यंदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे चित्र बदलेल, अशी अपेक्षा होती. मात्र, जुन्याच बड्या राजकीय घराण्यांतील प्रमुख नेते अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे पुढे आल्याने बँकेच्या राजकारणात बाटली तीच, फक्त लेबल नवीन अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यंदा सहकार विभागाने प्राप्त 4 हजार 13 ठरावांपैकी 366 ठराव अपात्र ठरवले आहेत. त्यामुळे व्यक्तिगत, शेतीपूरक आणि बिगरशेती मतदारसंघांतून 3 हजार 677 मतदार पात्र ठरले असून, त्यानुसार प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे.

प्रमुख आजी-माजी लोकप्रतिनिधींचा समावेश
प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत नगर मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्यासह आठ विद्यमान आणि आठ माजी आमदारांचा समावेश आहे. यात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार आशुतोष काळे, विवेक कोल्हे, मोनिका राजळे, प्राजक्त तनपुरे, संग्राम जगताप, काशिनाथ दाते आणि अक्षय कर्डिले यांचा समावेश आहे. तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, वैभव पिचड, भानुदास मुरकुटे, बबनराव पाचपुते, स्नेहलता कोल्हे, नरेंद्र घुले आणि पांडुरंग अभंग यांची नावेही यादीत आहेत. याशिवाय बँकेचे माजी संचालक व पदाधिकारी माधवराव कानवडे, चैताली काळे, गणपतराव सांगळे, दत्ता पानसरे, करण ससाणे, अमित भांगरे, गीतांजली शेळके, अण्णासाहेब म्हस्के आणि प्रशांत गायकवाड यांचे ठराव मंजूर झाले आहेत.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांचे ठराव
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, मंजूषा गुंड, बाबासाहेब भोस, राजश्रीताई घुले, माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्यासह माजी सभापती सुभाष पाटील, बाळासाहेब हराळ, अजय फटांगरे आणि कैलास वाकचौरे यांची नावे मतदार म्हणून निश्चित झाली आहेत. यातील अनेकांची ही पहिलीच वेळ आहे.

ज्येष्ठांसोबतच तरुणांना स्थान
या मतदार यादीत नव्या चेहर्‍यांमध्ये हर्ष तनपुरे, रणजितसिंह देशमुख, प्रतापसिंह पाचपुते, सुनीताताई गडाख, क्षितिज घुले, कृष्णा राजळे, युवराज तनपुरे, डॉ. उषाताई तनपुरे, राजेश परजणे, विवेक परजणे, वैशालीताई परजणे, शशिकलाताई पाटील, प्रणोती जगताप, कडूभाऊ काळे, सुरेश वाबळे, विश्वासराव गडाख, रत्नमाला लंघे, तुषार पिसाळ, पूनम पिचड, एम. एम. कातोरे, अभिलाष घिगे, अरुण मुंडे आणि नितीन औताडे यांचा समावेश आहे. याशिवाय नगरचे ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर, माधवराव लामखडे, किरण पाटील, कैलास शेवाळे, नितीन कोल्हे (कोपरगाव), केशव भवर, भिमाबाई गायकर, विश्वनाथ कोरडे, नंदकुमार झावरे, सुजित पाटील, सत्यजित कदम, संभाजी लांगोरे, राजेंद्र नागवडे, दीपक पटारे, तान्हाजी धसाळ, उदयसिंह पाटील, प्रशांत लोखंडे, काका कोयटे, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन संजय कडूस, युवराज ढेरे आणि भारत सोले पाटील यांचाही प्रारूप मतदार यादीत समावेश आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मृत व बोटांचे ठसे न उमटणार्‍या साडेतीन हजार कर्जदारांना...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या यादीतील मृत शेतकरी खातेदारांच्या वारसांना लाभ दिला जाणार आहे. याबरोबरच कर्जमुक्तीचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत...