अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली असून, या संस्थेसह मुदत संपलेल्या सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या वतीने निवडणूक कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काढण्यात आले होते. त्यानुसार, नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकार विभागाने तालुका पातळीवर दिले आहेत. मार्चअखेर नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नगर जिल्हा सहकारी बँक ही राज्यातील मोठ्या सहकारी संस्थांपैकी एक आहे. हजारो कोटींच्या ठेवी, कर्जवाटप आणि साखर कारखानदारीसोबतच शेतकर्यांना शेतीपिके व दूध उत्पादन वाढीसाठी कर्ज देऊन त्यांची आर्थिक पत निर्माण करणारी संस्था म्हणून या बँकेची ओळख आहे. आतापर्यंत पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या बँकेच्या निवडणुका झाल्या आहेत. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीचा या निवडणुकीवर परिणाम होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असणार्या या बँकेवर भाजपाचे पूर्णपणे वर्चस्व निर्माण होणार का, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
तीन कारखान्यांची मतदार यादी 1 एप्रिलला
निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार, 2025 मध्ये ज्या टप्प्यावर निवडणुका थांबवण्यात आल्या होत्या, त्या टप्प्यापासून प्रक्रिया पुढे सुरू केली जाणार आहे. यात नगर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या मअफ वर्ग संस्थांमध्ये तीन साखर कारखाने आणि जिल्हा बँकेचा समावेश आहे. ज्ञानेश्वर, सोनई आणि वृद्धेश्वर साखर कारखान्यांच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. दरम्यान, पुढील 15 दिवसांत जिल्हा बँकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
2025 मध्ये मुदत संपलेल्या संस्थांसाठी अर्हता दिनांक
2025 मध्ये मुदत संपलेल्या अ, ब, क आणि ड वर्गातील ज्या संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रलंबित आहेत, तेथील प्रशासकांचा कार्यकाळ संपवण्यात आला आहे. या संस्थांसाठी 1 फेब्रुवारी 2026 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला असून तो 3 महिन्यांसाठी वैध राहील.
2026 मध्ये मुदत संपणार्या संस्था
ज्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ 2026 मध्ये संपत आहे आणि ज्यांनी अद्याप मतदार यादीचा कार्यक्रम सादर केलेला नाही, त्यांच्यासाठी 24 फेब्रुवारी 2026 हा अर्हता दिनांक देण्यात आला आहे. जिल्हा सहकार विभागाने या सूचना तालुका पातळीवर दिल्या असून, पुढील आठवड्यात याचा आढावा घेतला जाणार आहे.
प्रशासकीय तयारीला वेग
बँकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानंतर जिल्हा सहकार विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याकडून प्रारूप मतदार यादीची माहिती मागवली आहे. यामध्ये कोणत्या विकास सोसायट्यांचे नाव मतदार यादीत राहणार, संबंधित सोसायटी थकबाकीत आहे का, मजूर सोसायट्या, दूध संघ यासह अन्य पात्र सहकारी संस्थांचे सुमारे 5 हजार ते 5 हजार 500 मतदार या निवडणुकीसाठी पात्र ठरणार आहेत. तसेच सुमारे 100 ते 150 व्यक्तिगत मतदारही मतदानासाठी पात्र असतील.





